नाशिक : अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, बी. एस्सी. (कृषी) पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी एमएचसीईटी परीक्षा जुलै-आॅगस्ट महिन्यात घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिलमध्ये होणारी परीक्षा लॉकडाउनमुळे पुढे ढकलण्यात आली होती.सदर परीक्षेच्या सुधारित तारखांचे वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले असून, त्यानुसार दि. ४ जुलै ते दि. १५ आॅगस्ट दरम्यान ही परीक्षा होणार आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित (पीसीएम) आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र (पीसीबी) या दोन गटांमध्ये स्वतंत्ररीत्या ही परीक्षा घेण्यात येणार आहे. मागील वर्षी सदर परीक्षा पीसीएम, पीसीएमबी आणि पीएसीएम अशा तीन गटांमध्ये घेण्यात आली होती.यंदा गुणांकनाचा गोंधळ झाल्याने परीक्षा पद्धतीत सुटसुटीतपणा आणावा यासाठी दोन गटात सदर परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेचा कालावधी जाहीर करण्यात आला असून, त्यानुसार या परीक्षेचे वेळापत्रक जूनमध्ये जाहीर करण्यात येणार आहे. एमएच सीईटी परीक्षा आॅनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे.सीईटी सेलतर्फे देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमुद केले आहे. एमएस सीईटी परीक्षा दि. ४ जुलै ते दि. १५ आॅगस्ट या कालावधीत घेण्यात येणार आहे. प्रत्यक्षात महिनाभराचा कालावधी असला तरी त्यांचा विचार करता ही परीक्षा पंधरा दिवसांत पार पडेल, असे परीक्षा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
एमएच सीईटी परीक्षा जुलै-आॅगस्ट महिन्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 11:41 PM