नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक परिसरातील जागृत देवस्थान व धनगर समाजाचे श्रध्दास्थान असलेला म्हाळोबा महाराज यात्रोत्सव यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे.
दरवर्षी माघ पौर्णिमेला दोडी येथे म्हाळोबा महाराज यात्रोत्सव असतो. यावर्षी २५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत यात्रा होती. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ग्रामपंचायत प्रशासनामार्फत यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. या यात्रेतही लाखाच्या आसपास भाविक दर्शनासाठी येत असतात. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश येथील धनगर समाज बांधव दर्शनासाठी येत असतात. नवसपूर्तीसाठी मोठी गर्दी होते. गेल्या काही दिवसात कोरोनाचा आकडा सिन्नर तालुक्यात पुन्हा वाढू लागला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये, त्यासाठी यंदाचा यात्रोत्सव मोठा न भरविता केवळ धार्मिक कार्यक्रम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यात्रा उत्सवानिमित्त मिरवणुका, पालखी सोहळा, नवसपूर्ती आदी कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच यात्रा बंद असल्याने मंदिर परिसरात कुठल्याही प्रकारची प्रसादाची दुकाने, खेळणी, खाद्यपदार्थ विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. तसे आढळून आल्यास ग्रामपंचायत प्रशासनामार्फत ५००० हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे. मंदिर परिसर व गावात इतर सार्वजनिक ठिकाणी विना मास्क व्यक्ती आढळून आल्यास १००० हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. पोलीस प्रशासन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेणार आहे. भाविकांनी धार्मिक कार्यक्रमांना एकाच वेळी गर्दी न करता कोरोनाचे नियम पाळून दर्शन घेण्यासह धार्मिक कार्यक्रम करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
इन्फो...
सिन्नर तालुक्यात कोरोनाचा आकडा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर दोडी येथील म्हाळोबा महाराज यात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्हा प्रशासनामार्फत निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन सर्व भाविक व नागरिकांनी करावे. मंदिर परिसरात जास्त गर्दी करू नये. भाविक व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे.
फोटो- २३ म्हाळोबा
दोडी येथील म्हाळोबा महाराज