नाशिक : म्हसरूळ भागात शेतकऱ्यांसह नागरिकांनी पोळा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला. सांयकाळी गावातून शेतकºयांकडून आकर्षक सजविलेल्या बैलजोडींसह अश्व व गाय वासरुंची मिरवणूक काढण्यात आली होती. गावातील दक्षिणमुखी मारुती मंदिरासमोर बैलजोडीकडून सलामी देण्याचा विशेष कार्यक्र म झाला. यावेळी महिलांनी औक्षण करून पुरणपोळीचा नैवेद्य आणि लाह्या-धान्य देऊन पूजन केले. यंदा म्हसरूळ गावातील टांगाशर्यतींचे शौकीन शेतकरी रमेशराव गायकवाड व नीलेश गायकवाड यांच्या पाच लाख रुपये देऊन खरेदी केलेल्या ‘हरण्या-कृष्णा’ बैलांची आकर्षक सजावटी केली होती. ही जोडी गावात आकर्षणाचे केंद्र बनली होती. या मुख्य जोडींची सूर्यवंशी मळा भाग ते म्हसरूळ गावापर्यंत मिरवणूक काढण्यात आली व त्यानंतर मारुती मंदिरासमोर लक्षवेधी बैलांसह अश्वाकडून सम्मानपूर्वक मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी जनक महाराज सोळंके, वसंतराव मोराडे, अशोक बुरुंगे, पोलीसपाटील अशोक मोराडे, प्रकाश उखाडे, सुनील जाधव, विनायक सूर्यवंशी, शिवाजी सातकर, सुनील मोराडे आदी उपस्थित होते. मिरवणूक, मानवंदनेचा मुख्य कार्यक्रम पाहण्यासाठी ग्रामस्थ व परिसरातील महिला-पुरुष व बालमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
म्हसरूळला पोळा सण उत्सवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 12:37 AM