मखमलाबादला जाणाऱ्या रस्त्यावर पवार मळ्याजवळ मंगळवारी रात्रीच्या सुमारास एका महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. याबाबत एका जागरुक नागरिकाने म्हसरुळ पोलिसांना माहिती कळविली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे हे हवालदार संजय राऊत, सतीश वसावे, मंगेश दराडे आदींच्या पथकासह घटनास्थळी पोहचले. येथील नाल्याजवळ २० ते २५ वयोगटातील विवाहित महिला रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेली पोलिसांना आढळून आली. या महिलेच्या गळ्यावर, कपाळावर तसेच पोटावर धारदार शस्त्राने वार करुन ठार मारल्याचे पोलिसांनी पंचनाम्यात निष्पन्न केले. महिलेची ओळख रात्री उशिरापर्यंत पटलेली नव्हती. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी म्हसरुळ पोलिसांनी अन्य पोलीस ठाण्यांना माहिती देत बेपत्ता महिलेबाबत कोणी कोणत्या पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले असता त्वरित म्हसरुळ पोलिसांना कळवावे असा संदेश बिनतारी यंत्रणेवरुन धाडला.
रात्री उशिरा पंचवटी पोलीस ठाण्यात विनोद आखाडे नावाची व्यक्ती त्याची पत्नी बेपत्ता झाल्याने तक्रार देण्यासाठी आला. पोलिसांनी त्याला घेऊन घटनास्थळ गाठले व मृतदेह दाखविल्यानंतर मृतदेह त्यांनी ओळखला व विवाहितेचे नाव स्पष्ट केले.आखाडे दाम्पत्य मोरे मळ्यात वास्तव्यास असून विनोदचा डिजेचा व्यवसाय आहे. पोलिसांनी प्रथमदर्शनी चौकशीसाठी विनोदला ताब्यात घेतले आहे. मात्र पूजाचा खून कोणी व का केला असावा? याबाबतचे कारण आतापर्यंत स्पष्ट होऊ शकलेले नाही. या खुनाचा उलगडा करण्यासाठी म्हसरुळ पोलिसांचे पथक तपास करत आहेत.
---इन्फो---
हल्लेखोर रिक्षामधून आल्याचा अंदाज
पूजाला ठार मारणारे हल्लेखोर हे तिला एका रिक्षातून नाल्याजवळील निर्जन ठिकाणी घेऊन आल्याचा अंदाज घटनास्थळी रिक्षाच्या चाकांच्या खुणांवरुन पोलिसांनी वर्तविला आहे. गुन्ह्यात वापरलेल्या रिक्षाचा पोलीस शोध घेत असून महिलेचा खून अनैतिक संबंधातून झाल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे.