अपयशातून आलेले गारठलेपण फार काळ टिकून राहिले तर भविष्यातील यशाचा ऊर्जादायी प्रवासही अवघड झाल्याखेरीज राहत नाही. राजकीय परिघावरील असले शैथिल्य तर कोणत्याही पक्षाला परवडणारे नसते. म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मध्यंतरीची निस्तेजावस्था दूर सारत आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागली असून, नाशिक जिल्हाध्यक्षपदावरील नियुक्तीसह शहर कार्यकारिणीलाही त्यातून मुहूर्त लाभला आहे.
नाशिककडे ‘मनसे’चा म्हणजे राज ठाकरे यांचा गड म्हणून पाहिले जाण्यासारखी स्थिती मध्यंतरी होती. शहरातले तीन आमदार ‘मनसे’चे होते. लोकसभेच्या निवडणुकीतही दुसऱ्या क्रमांकाची मते या पक्षाला मिळाली होती, तर नाशिक महापालिकेतही तब्बल ४० नगरसेवक निवडून देत सत्ता भूषविण्याची संधी नाशिककरांनी दिली होती. परंतु दिलेल्या शब्दाप्रमाणे फारसे काही न घडल्याने व जे घडले त्यालाही विलंबच झाल्याने मतदारांनी सर्वच ठिकाणची सत्तेची सतरंजी खेचून घेतली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ‘मनसे’च्या आघाडीवर शांतताच होती. राज ठाकरे यांचे नाशिक दौरेही कमी झाले, त्यामुळे पक्ष संघटनात्मक स्थितीही विकलांग झाली होती. महापालिकेतील सत्तेतून पायउतार व्हावे लागल्यावर तर अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झालेला होता. पक्ष स्थापनेनंतर नेमले गेलेल्या प्रकाश दायमा, संदीप पाटील व सचिन ठाकरे या पक्षाच्या तिघा जिल्हाध्यक्षांनी कालांतराने पक्षाला रामराम केला. त्यानंतरच्या सुदाम कोंबडे यांनीही अन्य पक्षाचा रस्ता धरला. शहराध्यक्षही निवांत होते. त्यामुळे या पक्षात कमालीचे हबकलेपण आले होते.
ठाकरे यांच्या अधूनमधूनच्या दौºयाप्रसंगी जरा सळसळ व्हायची, पुन्हा निस्तेजावस्था यायची. अशात गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या जिल्हाध्यक्षपदी माजी नगरसेवक अनंता सूर्यवंशी यांची नेमणूक केली गेली, तर शहराध्यक्षपदी अनिल मटाले यांच्या नेमणुकीला सहा महिन्यांपासून अधिक काळ लोटला तरी घोषित होऊ न शकलेल्या कार्यकारिणीलाही अखेर मुहूर्त लाभला व तब्बल पावणेतीनशेपेक्षा अधिक संख्येतील पदाधिकाºयांची घोषणा करण्यात आली. या प्रयत्नातून नाही काही तर किमान पक्ष संघटनात्मक पातळीवर नवनिर्माण घडून येण्याची अपेक्षा बाळगता येणारी आहे.