सातपूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने अंबड औद्योगिक वसाहतीत उभारलेल्या बहुमजली गाळे प्रकल्पातील (फ्लॅटेड बिल्डिंग) गाळे विक्रीला फारसा प्रतिसाद लाभलेला नाही. सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना परवडणारे दर नसल्याने हे गाळे पडून असून, २०७पैकी अवघ्या २५ गाळ्यांची विक्री झाली आहे.
अंबड औद्योगिक वसाहतीतील १४ हजार ८५० चौरस मीटर भूखंडावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बहुमजली गाळे प्रकल्प (फ्लॅटेड बिल्डिंग) उभारला आहे. तीन मजली असलेल्या या प्रकल्पात प्रत्येक मजल्यावर ६९ याप्रमाणे २०७ गाळे बांधण्यात आलेले आहेत. या २०७ गाळ्यांपैकी १५ गाळे वाणिज्य वापरासाठी आहेत, तर माजी सैनिक, अपंग, महिला, एससी, एसटी यांच्यासाठी ६० गाळे राखीव ठेवण्यात आले आहेत. लघु उद्योजकांच्या मागणीनुसार एमआयडीसीने गाळे प्रकल्प उभारला आहे. जे लघु उद्योग भाड्याच्या जागेत आपला उद्योग चालवीत आहेत. त्यांच्यासाठी हे गाळे उपलब्ध करून दिले आहेत. इमारत पूर्ण होऊन चार ते पाच वर्षांचा कालावधी लोटला आहे. सर्वप्रथम विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ऑगस्ट २०१९ मध्ये गाळे विक्रीची निविदा काढण्यात आली होती. पण, फारसा प्रतिसाद मिळाला नाही. गाळ्यांचे दर खूपच जास्त असल्याचे उद्योजकांचे म्हणणे होते.
निमा, आयमा संघटनांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर अखेर एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबनगल यांनी गाळ्यांचे दर १० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तळमजल्याचा दर ४६०३ रुपये, पहिला मजला ४३३३ रुपये, दुसरा मजला ४०६३ रुपये आणि वाणिज्य गाळ्यांचा दर ९२०७ रुपये चौरस मीटर आहे. तरीही गाळ्यांना अपेक्षित असा प्रतिसाद मिळालेला नाही. लॉकडाऊन काळातही हे गाळे विक्रीची निविदा काढण्यात आली. त्याकडेही उद्योजकांनी पाठ फिरविली.
इन्फो===
एमआयडीसीने अंबड औद्योगिक वसाहतीत २५ वर्षांपूर्वी आयटी उद्योगांसाठी प्रशस्त अशी इमारत उभारली आहे. तत्कालीन माहिती व प्रसारण मंत्री प्रमोद महाजन यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले होते. गेल्या २५ वर्षांपासून ही इमारत धूळखात पडून आहे. आता या गाळे प्रकल्पाचीदेखील आयटी पार्कच्या इमारतीसारखी दुरवस्था होणार नाही. याची दक्षता घेऊन दरवाढ कमी करुन गरजू उद्योजकांना गाळे वाटप करावेत, अशी अपेक्षा केली जात आहे.