वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना महामारीच्या दरम्यान शस्रक्रिया थांबल्या होत्या, तर लॉकडाऊन शिथिल होताच तालुक्यातील अनेक आरोग्य केंद्रांत नसबंदी शस्रक्रिया सुरू झाल्या. परंतु शासनाने दिलेल्या नियमांना डावलून शिरसगाव, ठाणापाडा आरोग्य केंद्रांवर स्तनदा मातांना अक्षरश: शस्रक्रियेच्या नावाखाली वेठीस धरण्याचा प्रकार हरसूल जिल्हा परिषद सदस्य रूपांजली माळेकर व सभापती मोतीराम दिवे यांनी बुधवारी (दि.२०) रात्री १ वाजता अचानक दिलेल्या भेटीत उघडकीस आला आहे.
माळेकर व दिवे यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शहनिशा करण्यासाठी दोन्ही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी मध्यरात्री नसबंदी शस्रक्रिया झालेल्या आरोग्य केंद्रांना भेट दिली. त्यामध्ये शिरसगाव आरोग्य केंद्रात २५ बाय २५ फुटाच्या खोलीत, वॉर्डात कुठल्याही निर्जंतुकीकरणाची सुविधा न पार पाडताच जमिनीवर अंथरून टाकून महिला रुग्णांना झोपवण्यात आले होते. प्रत्यक्षात शिरसगाव आरोग्य केंद्रास १५० नसबंदीचे टार्गेट असताना, टार्गेट पूर्ण करण्यासाठी तालुक्यातील आरोग्य कर्मचारी क्षमेतेपेक्षा दुप्पट नसबंदी करून स्तनदा मातांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार चालू असल्याचे या लोकप्रतिनिधींनी उजेडात आणले.त्र्यंबकेश्वर तालुक्यात नसबंदी शस्रक्रिया करण्यासाठी एकच वैद्यकीय अधिकारी उपलब्ध आहे. सदर वैद्यकीय अधिकारी शस्रक्रिया करून गेल्यानंतर रुग्णांना चार दिवस निगराणीत ठेवण्यात येते, पण शस्राक्रियेनंतर चार दिवस रुग्णांची मोठी हेळसांड होत असते. स्तनदा मातांना थंडीच्या दिवसांत जमिनीवर झोपलेल्या अवस्थेत बघून हरसूल गटाच्या जि. प. सदस्य रूपांजली माळेकर यांनी तत्काळ ५० ब्लँकेटस्, पाणी, बिस्कीट उपलब्ध करून दिले. यावेळी विनायक माळेकर, शिवसेनेचे समाधान बोडके, मिथुन राऊत, हिरामण गावित, राहुल शार्दुल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.कोरोनाच्या नियमांचे उल्लंघनकोरोनाच्या काळात कुठलेही नियम, निकष न पाळता एकच खोलीत जमिनीवर दाटीवाटीने त्यांना झोपवण्यात येत आहे. तर त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाइकांना बाहेर व्हरांड्यातच झोपावे लागते. यावेळी स्तनदा मातांना गरम पिण्याच्या पाण्याची व्यवस्था दिसली नाही. शासनाच्या नसबंदीच्या टार्गेटसाठी स्तनदा मातांच्या जिवाशी खेळणाऱ्या आरोग्य यंत्रणेवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.शिरसगाव व ठाणापाडा आरोग्य केंद्रात नसबंदी करण्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त मातांना आणून त्यांच्या जिवाशी खेळ खेळला जात आहे. त्यामुळे क्षमतेइतक्याच नसबंदी करण्यात याव्यात. शासनाचे टार्गेट पूर्ण करण्याच्या नादात स्तनदा मातांची हेळसांड करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.- रूपांजली माळेकर, जि. प. सदस्य.