नाशिक : शहरातील अनारोग्याचे वातावरण दूर करण्यासाठी महापालिकेने शहरातील गोठे स्थलांतरित करण्यासाठी नोटिसा देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार गोठेधारक स्थलांतरासाठी तयार असले तरी महापालिकेने जागा द्यावी त्याठिकाणी गोठे स्थलांतरित करण्यास तयार असल्याचे संबंधितांचे म्हणणे असून, त्यासंदर्भात लवकरच ते आयुक्तांची भेट घेणार आहेत. शहरातील गोठे स्थलांतराबाबत अनेक आयुक्तांनी यापूर्वी तयारी केली होती; मात्र गोठेधारकांचा विरोध आणि त्यापाठोपाठ यासंदर्भात व्यवहार्यता नसल्याने हा प्रस्ताव बारगळला होता. आता आयुक्त मुंढे यांनी शहरातील गोठेधारकांना हटविण्यासाठी तयारी सुरू केली असून, महासभेवर तसा प्रस्ताव मांडून धोरण ठरविणार असल्याचे आयुक्तांचे म्हणणे आहे. अनेक गोठेधारकांनी नकार न देता सकारात्मक भूमिका घेतली असली तरी शहराबाहेर जागा दिल्यास स्थलांतरित होण्याची तयारी दर्शविली आहे. शाहू खैरे यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून गोठ्यांबाबत महापालिका विरोधात भूमिका घेत असे. अनेकांना नोटिसा पाठविल्या जातात. नागरिकांना खरोखरच त्रास होत असेल तर शहराबाहेर स्थलांतरित होण्याची गोठेधारकांची तयारी आहे; परंतु त्यासाठी जागा देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
जागा दिल्यास गोठ्यांचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:41 AM