पेठ तालुक्यातील बहुतांश गावांना मंगळवार २० जुलै रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची नोंद मेरी येथील भूकंपमापन केंद्रात झाली असल्याची माहिती तहसीलदार संदिप भोसले यांनी दिली.
नाशिक पासून साधारण ४० किमी अंतरावर सकाळी ७ वाजता धक्के जाणवले असून ३ रिश्टल स्केल तीव्रता असल्याची नोंद झाली आहे. पेठ तालुक्यातील गोंदे, जोगमोडी, एकदरे, आसरबारी, मोहपाडा, जांभूळमाळ, हेदपाडा, कोहोर, पेठ, खोकरतळे, भायगाव आदी परिसरात धक्के जाणवले.
यामध्ये कोणतीही हानी झाली नसली तरीही पेठ तालुक्यात वारंवार बसणारे धक्के तालुकावासीयांची धडकी भरवणारी असल्याचे नागरिकांनी भीती व्यक्त केली आहे. तालुक्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार संदिप भोसले यांनी केले आहे.