नाशिक : हास्ययोगासाठी कुठल्याही प्रकारची पात्रता आवश्यक नसते. हास्य हे जीवनाचे संगीत आहे, मात्र दुर्दैवाने आजच्या धकाधकीच्या जीवनात मनुष्यप्राणी हास्य विसरला आहे. हास्याचे वरदान निसर्गाकडून केवळ सजीवसृष्टीतील मानवालाच मिळाले आहे, असे प्रतिपादन पुणे येथील साहित्य परिषदेचे कार्यवाह मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.नाशिक जिल्हा सहकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे पहिले पुष्प ‘जगणं सुंदर आहे’ या विषयावर परशुराम साईखेडकर नाट्यगृहात गुंफले.ते म्हणाले, हास्य आत्म्याचा नैवेद्य व जीवनाचे संगीत आहे. माणसाची विनोदबुद्धी जर लोप पावली तर तो सातत्याने ताणतणावाखालीच वावरू लागतो. आजच्या स्पर्धेच्या युगात मनुष्यप्राणी केवळ आणि केवळ दुसऱ्यांसाठी धावताना दिसत आहे. त्यामुळे तो हसणे विसरला आहे. विनोदबुद्धी क्षीण होणे हे सामाजिक संस्कृती लोप पावण्याचे लक्षण आहे, असेही जोशी यावेळी म्हणाले. संतांनीदेखील हास्ययोग कधीही नाकारला नाही, त्यांनी नेहमीच लोकरंजनातून लोकशिक्षण आणि प्रबोधनावर भर दिल्याचे दिसून येते. हास्ययोगामुळे मानवी आरोग्य निरामय राहण्यास मदत होते, तरीही मनुष्य हसणे विसरत चालला आहे, अशी खंतही त्यांनी बोलून दाखविली. दरम्यान, बँकेचे अध्यक्ष सुनील बच्छाव, उपाध्यक्ष अजित आव्हाड, भाऊसाहेब खातळे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश क्षीरसागर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. विवेक उगलमुगले यांनी सूत्रसंचालन केले.
निखळ हास्य हे जीवनाचे संगीत : मिलिंद जोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 11:01 PM