कवडदरा- इगतपुरी तालुक्यातील कवडदरा,घोटी खुर्द,साकूर,पिंपळगाव डुकरा परिसरातील बहरलेल्या मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याने पीक पूर्णपणे धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहे. कवडदरा शिवारात शेतकऱ्यांनी जनावरासाठी चारा म्हणून मोठ्या प्रमाणात मक्याची पेरणी केली आहे. मक्याचे कणीस विक्र ी करणे तसेच जनावरांना चारा उपलब्ध व्हावा, याकरिता मक्याची पेरणी केली जाते. मात्र लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने बाधित झालेला मक्याचा चारा जनावरांना घातल्यास जनावरे दगावण्याची शक्यता आहे. मक्याच्या एका रोपात तीन ते चार अळ्या आतील भागात दिसून येत आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांना फवारणी करण्याचे आवाहन केले आहे. मात्र फवारणीसाठी हजारो रु पये खर्च करूनही अळी आटोक्यात येत नसल्याचे कवडदरा येथील शेतकरी अजित निसरड यांनी सांगितले.