नाशिक : राजकारणी कोणत्या गोष्टीचा कशासाठी उपयोग करून घेतील, ते कधीच सांगता येत नाही. रविवारी आलेल्या कोजागरी पौर्णिमेचा उपयोगदेखील काही उमेदवारांकडून अत्यंत कौशल्याने करण्यात येणार आहे. काही उमेदवारांनी दुग्धपानाच्या निमित्ताने ज्ञातीबांधवांचे मेळावे घेतले आहेत, तर काहींनी मोठ्या मंडळांच्या, कॉलन्यांच्या सामूहिक कोजागरीच्या दुग्धपानात आपल्या प्रचाराचे ‘केशर’ मिसळण्यासाठी त्यांना उदार हस्ते दूध उपलब्ध करून देण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत.यंदाच्या विधानसभेपूर्वी नवरात्रोत्सव आणि कोजागरी हे दोन मुख्य सण आले. त्यात नवरात्रोत्सवात तरुणाई अधिक प्रमाणात बाहेर पडत असल्याने त्या तरुणाईला आकर्षित करण्याचे प्रयत्न पदाधिकाऱ्यांच्या नवरात्रोत्सव मंडळाद्वारे करण्यात आले होते. कोजागरी पौर्णिमा हा संपूर्ण कुटुंबाचा सण असल्याने सर्व कुटुंबीय त्यामुळे आसपासच्या लोकांमध्ये मिसळून सण साजरा करण्याची प्रथा आहे. या संधीचा फायदा उठवत कोजागरी पौर्णिमेच्या रात्रीदेखील मोठी मंडळे, कॉलन्यांमधील गेट टुगेदरला जाऊन तेथील अधिकाधिक मतदारांना भेटण्याचे नियोजन काही उमेदवारांनी आखले आहे. रात्री १० पासून मध्यरात्री १ वाजेपर्यंत बहुतांश गच्ची आणि हिरवळींवर हे कार्यक्रम रंगणार आहेत. त्यामुळे आपापल्या मतदारसंघातील किमान ३-४ ठिकाणच्या कार्यक्रमांना हजेरी लावत प्रचार करण्याचे नियोजन अनेक उमेदवारांकडून आखण्यात आले आहे.कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने एका उमेदवाराने तर ज्ञातीबांधव मेळावाच घेतला आहे. त्याची निमंत्रणे केवळ भ्रमणध्वनीवरच देण्याची जबाबदारी त्याच्याच ज्ञातीच्या निकटच्या कार्यकर्त्यांकडून दिली जात आहेत. त्यातून आपल्या समाजातील बांधव आणि भगिनी एकत्र येऊन किमान काही हजार मतांची निश्चिती करण्याचे नियोजनदेखील त्याच प्रयत्नांचा भाग आहे.
‘कोजागरी’चा दुग्धशर्करा योग...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 12:54 AM