नाशिक : शहरात लॉकडाऊनच्या काळात सर्वच बाजार व्यवस्था प्रभावित झालेली असताना शासन-प्रशासनाकडून दूध विक्रीला परवानगी असल्याने शहरातील दूध पुरवठा मात्र सुरळीत सुरू आहे. शहरातील नागरिकांना घरपोच दूध मिळत असून, दूध बाजारातही दुधाची नियमित आवक होत असली तरी लॉकाडाऊनमुळे काही नागरिक घराबाहेर पडणे टाळत असल्याने दूध बाजारातील विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागत आहे. मात्र, येणारा ग्राहक दोन ते तीन दिवस पुरेल इतके दूध एकदाच घेत असल्याने त्याचा मागणीवर फारसा परिणाम झाला नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
नाशिक शहरात गेल्या काही दिवसांत दुधाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, म्हशीच्या दुधाचा भाव साठ रुपये लिटर, तर गायीच्या दुधाचा भाव ४० रुपये लिटर आहे. शहरात मोठ्या प्रमाणात दुधाचे उत्पादन होते. त्याचबरोबर जिल्ह्याच्या इतर भागांतूनदेखील शहराला दुधाचा पुरवठा होतो. मागील वर्षापासून हिवाळ्याप्रमाणे उन्हाळ्यातही दुधाची मागणी वाढत असून, दरही कायम आहेत. गेल्या वर्षापासून जिल्ह्यात कोरोनाचे संकट ओढावल्याने लोक सकस आहार घेण्याकडे लक्ष देत आहेत. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे अनेकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने सकाळ-संध्याकाळ हळदीचे दूध घेणे सुरू केले आहे. त्याचबरोबर ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे अशा लोकांनी औषधाचा दुष्परिणाम होऊ नये म्हणून दूध घेणे सुरू केले आहे. त्यामुळे दुधाला मागणी वाढली असून, नाशिकमधील सर्वच बाजार ठप्प असताना दूध बाजारातील उलाढाल मात्र नियमित सुरू असल्याचे दिसून येत आहे.
कोट-
कोरोनामुळे लॉकडाऊन असतानाही दुधाला चांगली मागणी आहे. त्यामुळे दरही स्थिर आहेत. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त असल्याने घरोघरी दूध पोहोचविण्यात काही प्रमाणात अधिक वेळ लागतो. मात्र, त्याचा विक्रीवर फारसा परिणाम झालेला नाही.
- गणपत कासार, दूध विक्रेता.
इन्फो-
दूध बाजारात फळे, भाज्यांचीही विक्री
शहरात लॉकडाऊनच्या निर्बंधांतून जीवनावश्यक वस्तूंमध्ये केवळ दूध विक्रीला शिथिलता आहे, तर भाजीपाल व फळे विक्रीसाठी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतची वेळ निश्चित करण्यात आलेली आहे. मात्र, दूध बाजारात सायंकाळी दुधासोबत काही भाजी व फळांचे विक्रेतेही त्यांची दुकाने लावत असल्याने दूध बाराजारात सायंकाळच्या सुमारास गर्दी होत असल्याचे दिसून येत असून, काही ठिकाणी सायंकाळीही बेकरी पदार्थांचीही विक्री सुरू ठेवत निर्बंधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.