त्र्यंबकेश्वर/ दिंडोरी : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रधान केंद्र, दिंडोरी तसेच समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वरसह देश व देशाबाहेरील जवळपास ९ हजार केंद्रांवर सेवेकऱ्यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळत श्री दत्त जन्मोत्सव मंगलमय वातावरणात साजरा केला. या निमित्ताने गेल्या आठवडाभरात मोजक्या सेवेकऱ्यांनी समर्थ केंद्रांवर तर आपापल्या घरी जगभरातील लाखो सेवेकरी व भाविकांनी श्रीगुुरुचरित्र, नवनाथ, भागवत, दुर्गा सप्तशती, स्वामी चरित्र सारमृत ग्रंथांची पारायणे केली. सर्वच केंद्रांवर पहाटेपासूनच श्री दत्त जयंतीनिमित्ताने लगबग दिसून आली. दिंडोरी दरबारात गुरुमाउली अण्णासाहेब मोरे तर त्र्यंबेश्वरमध्ये चंद्रकांत दादा मोरे यांच्या हस्ते सकाळपासूनचे सर्व पूजा विधी संपन्न झाले.
बारा वाजेनंतर श्रीगुुरुचरित्रामधील चौथ्या अध्यायाचे वाचन सुरू करण्यात आले. या अध्यायात ह्यतीन बाळे झालीह्ण या ओवीचे बरोबर १२.३९ मिनिटांनी वाचन होताच उपस्थित सर्व भाविक, सेवेकरी यांनी ह्यअवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तह्ण असा जयघोष करत श्री दत्त जन्माचा आनंद साजरा केला. दिंडोरीत उपस्थित मोजक्या प्रतिनिधींशी अण्णासाहेब मोरे व त्र्यंकेश्वरमध्ये चंद्रकांत दादा मोरे यांनी हितगुज केले.
श्री दत्तात्रय महाराज यांनी विविध अवतारात संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याचा परिचय त्यांनी करून दिला. याबरोबरच श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या माध्यमातून संपूर्ण जगभर सुरू असलेल्या कार्याचा आढावा घेऊन येत्या वर्षात आणि भविष्यकाळात सेवा मार्गाच्या वतीने हाती घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती देऊन या सर्व समाजोपयोगी कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही गुरुमाउली यांनी केले.
गोरगरिबांना अद्ययावत, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वैद्यकीय सुविधा त्या सुध्दा मोफत उपलब्ध करून देण्यासाठी सद्गुरू मोरे दादा हॉस्पिटलचा प्रोजेक्ट हाती घेण्यात आला असून, तो सर्वांच्या सहकार्याने लवकरच पूर्णत्वास नेण्याचा मानस गुरुमाउली यांनी याप्रसंगी व्यक्त केला.