नाशिक : गेल्या पाच महिन्यांपासून जिल्हा परिषदेला सन- २०१५-१६ चा जिल्हा नियोजन विकास मंडळाकडून जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून त्यानुसार त्याचे वितरणही करण्यात आले आहे. मात्र बांधकाम विभागातील रस्त्यांच्या कामांबाबत मागील तारखांचे प्रशासकीय मंजुरी देऊन कार्यारंभ आदेश देण्याचे प्रकार जिल्हा परिषदेत सुरू असल्याची चर्चा आहे.विशेष म्हणजे पाच महिने उलटूनही जिल्हा परिषदेत बांधकाम विभागच नाही, तर सर्वच विभागांचा निधी खर्च झालेला नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषदेतून नुकतेच बदली होऊन गेलेले एक कार्यकारी अभियंता यासर्व बॅकडेटेड कारभारामागे असल्याची दबक्या आवाजात चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे.बांधकाम विभाग इवद एकसाठी सुमारे पाच कोटींचा निधी जिल्हा नियोजन विकास मंडळाकडून रस्त्यांच्या कामांसाठी मंजूर झाला आहे, तर बांधकाम विभाग दोनसाठी सुमारे सहा कोटींचा निधी मंजूर झाला असून, त्यातील मागील कामांचे दोन कोटी ४२ लाखांचे दायित्व वजा जाता, सुमारे तीन कोटी ८० लाखांचा निधी शिल्लक राहतो. त्याच्या दीडपट विकासकामांना प्रशासकीय मान्यता द्यायची म्हणजे सुमारे तीन कोटी ८० लाख व एक कोटी ८० लाख असा सुमारे पाच कोटी ४० लाखांचा निधी बांधकाम विभाग दोनसाठी रस्त्यांच्या कामांना मंजूर झाला आहे. तसेच बांधकाम विभाग तीनसाठी सुमारे तीन कोटी ६३ लाखांचा निधी प्राप्त असून, त्याच्या दीडपट रक्कमेच्या कामांना म्हणजेच सुमारे ५ कोटी ४२ लाखांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली जाणार आहे. अर्थात या मंजुरीतून केवळ पाच लाखांच्या आतील रस्त्यांची कामे एप्रिल व मे महिन्यातील प्रशासकीय मान्यता दाखवून त्यांना सप्टेंबर महिन्यातील कार्यारंभ आदेश देण्यासाठी व्यूहरचना आखण्यात येत असल्याचे समजते. पाच पाच महिने उलटूनही जिल्हा नियोजन विकास मंडळाकडून कोट्यवधीचा निधी रस्ते कामांसाठी मंजूर झालेला असतानाही त्या कामांना अजूनही सुरुवात झालेली नसल्याचे कळते. याबाबत प्रशासन प्रमुखांनी सर्वच पदाधिकाऱ्यांना पत्र पाठवून वेळेत कामे पूर्ण होण्यासाठी कामांचे नियोजन करून ही कामे सुरू करण्याबाबत सूचना केल्याचीही चर्चा आहे. एकीकडे निधी नाही म्हणून टाहो फोडायचा आणि दुसरीकडे निधी असूनही त्यांचे पाच पाच महिने नियोजन करायचे नाही, असा प्रकार सुरू आहे. (प्रतिनिधी)
कोट्यवधींच्या कामांचे रखडले नियोजन
By admin | Published: September 07, 2015 11:20 PM