नाशिकरोड : नाशिक साखर कारखान्याची सुरक्षा ‘राम भरोसे’ असल्याने दोन दिवसांपूर्वी कारखान्याच्या स्टोअरमधून लाखो रुपयांची सामग्री चोरीस गेल्याचा प्रकार उजेडात आला आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे अधिकारी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्टोअरमधून काय चोरीस गेले यांचे गेल्या दोन दिवसांपासून मोजमाप करण्यात गुंतले आहेत. पोलीस, जिल्हा बॅँक, कारखान्याचे संबंधित कोणीच गांभीर्याने लक्ष देत नसल्याने कारखान्याचे राहिलेले अस्तित्व धोक्यात आले आहे. नाशिक साखर कारखान्याचे जिल्हा बॅँकेकडे थकलेले कर्ज, व्याज व तेव्हाच्या तत्कालीन संचालकांनी गांभीर्य न ठेवल्याने गेल्या चार वर्षांपासून कारखान्याचा गळीत हंगाम बंद पडला आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मुबलक ऊस उपलब्ध असतानासुद्धा संचालकातील हेवेदावे व राजकारण यामुळे कारखाना बंद पडला. थकीत कर्ज व व्याज वसुलीपोटी कायद्यानुसार जिल्हा बॅँकेने नासाका व मालमत्तेचा ताबा जानेवारी २०१६ मध्ये घेतला. कारखान्याची जप्ती करताना कारखान्यांकडून मालमत्तेची जशी यादी करून दिली तसाच ताबा जिल्हा बॅँकेने घेतल्याचे बोलले जात आहे. जिल्हा बॅँकेच्या ताब्यात असलेल्या कारखान्याच्या सुरक्षिततेसाठी तीन पाळ्यांमध्ये एकूण फक्त तीन सुरक्षारक्षक आहेत. दिवसा उजेडामुळे कारखान्याची सुरक्षितता सांभाळण्यात जास्त अडचण येत नाही. मात्र रात्री सुरक्षारक्षकांकडे साधी बॅटरीसुद्धा नसते. तसेच कारखान्याच्या एका भागात अनेकवेळा बिबट्या व त्याच्या बछड्यांचे दर्शन झाल्याने तेथे जाण्यास कोणी धजावत नाही. त्यामुळे रात्री सुरक्षारक्षक मुख्य प्रवेशद्वाराजवळच असतात. दोन दिवसांपूर्वी शनिवारी रात्री कारखान्याच्या स्टोअरमधून चोरी झाल्याचे उघडकीस आले. सुरक्षारक्षकांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने त्या ठिकाणी संशयास्पद असलेले दत्ता शिंदे, संजय पवार व शंकर काळे यांना पकडून पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी संशयितांची कसून चौकशी केली असता त्यांचा चोरीच्या प्रकरणाशी संबंध नसल्याचे निष्पन्न झाले. कारखान्याच्या पश्चिम बाजूचे तार कम्पाउंडच्या तारा तोडून आतमध्ये चारचाकी गाडी आणून स्टोअरमधून यंत्रसामग्री चोरून नेण्यात आली. स्टोअरमध्ये बेरिंगा, पितळी वॉल, बैलगाडीच्या चाकाच्या लोखंडी डस्कि, विद्युत मोटारी आदी यंत्रसामग्री मोठ्या प्रमाणात होती. चोरी झाल्याचे उघडकीस आल्यानंतर जिल्हा बॅँकेचे कारखान्यावरील शाखा व्यवस्थापक शिवाजी जाधव यांनी कारखान्याच्या कर्मचाºयांच्या मदतीने स्टोअरमधून काय चोरीस गेले यांचे गेल्या दोन दिवसांपासून मोजमाप सुरू केले आहे.सुरक्षा व्यवस्था रामभरोसेनासाका हा २०० एकर जागेत असून त्याचे सर्व बाजूकडील तार कम्पाऊंड तुटलेले आहे. अवघ्या नऊ सुरक्षारक्षकांवर तीन पाळीमध्ये कारखान्याची सुरक्षा सांभाळली जात आहे. अगोदर तत्कालीन संचालकांच्या अनागोंदी कारभारामुळे कारखाना बंद पडला. आता सुरक्षा व्यवस्था रामभरोसे असल्याने कारखान्यातील यंत्रसामग्रीची चोरी होऊ लागली आहे. नासाकाकडे राज्य शासन व संबंधित सर्वांनी गांभीर्याने लक्ष न दिल्यास अवसायानात गेलेल्या कारखान्याला आणखी घरघर लागेल.
नासाकाच्या स्टोअरमधून लाखोंच्या यंत्रसामग्रीची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:22 AM