नाशिक : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील गलथान कारभारामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाºयांचे कोट्यवधी रुपये बॅँकेत पडून असून, ते मिळत नसल्याने संबंधित कर्मचारी हवालदिल झाले आहेत. या कर्मचाºयांची हक्काची रक्कम त्वरित मिळावी यासाठी जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे कार्यकारी संचालक बकाल यांना निवेदन देण्यात आले.जिल्हा बॅँकेत जिल्हा परिषद, शासकीय शाळा तसेच अन्य खासगी अनुदानित शाळांचे वेतन होत असते. बॅँकेच्या आर्थिक गोंधळामुळे त्याचा फटका या शाळांच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाºयांना बसला. बॅँकेत पैसे नाही म्हणून कर्मचारी हात वर करीत आहेत. बॅँकेचे धनादेश सध्या चालत नाहीत, आरटीजीएस करणे बॅँकेने बंद केले आहे. अशावेळी कर्मचाºयांना रक्कम मिळत नसल्याने अनेक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. रक्कम त्वरित मिळावी, अशी मागणी राज्य शिक्षक परिषदेचे डी. यू. अहिरे, दत्ता वाघे पाटील, शंकर सांगळे, संजय पवार, संजय पाटील, प्रशांत शेवाळे, भारत खैरनार, वासुदेव भदाणे, विलास सोनार, डींगे, बी. एम. सोनवणे, किरण पाटील यांनी केली आहे.