नाशिक : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला लाखो रुपयांचा गंडा घालून राजस्थानच्या व्यापाऱ्याने पोबारा केल्याची घटना चांदवड तालुक्यात घडली असून, सदर व्यापाऱ्याचा शोध घेण्याची मागणी श्रमिक मुक्ती संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चांदवड तालुक्यातील जोपूळ, खडक ओझर, वडाळीभोई येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून राजस्थानच्या राजूभाई सिंग (हल्ली रा. पंचवटी, नाशिक) या व्यापाऱ्याने ४१ लाख ५५ हजार रुपयांचे द्राक्ष खरेदी केले, त्यापैकी त्याने शेतकऱ्यांना रोख स्वरूपात व आरटीजीएसने दहा लाख रुपये दिले, मात्र उर्वरित रक्कम देण्यास त्याने टाळाटाळ चालविली असून, राजस्थानात पलायन केले आहे. संबंधित व्यापाऱ्याचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करावी व शेतकऱ्यांची रक्कम वसूल करून मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष अरविंद चव्हाण, डॉ. भरत करिया, नीलेश सोनवणे, किरण नितनवरे, बी. टी. देवरे, संजय पगार आदिंनी हे निवेदन दिले.
व्यापाऱ्याचा शेतकऱ्याला लाखोंचा गंडा
By admin | Published: February 16, 2017 5:27 PM