नवी दिल्ली - तीन कृषी कायदे रद्द करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत मधाळ भाषा वापरली आहे. या आंदोलनात ७५० जण मरण पावले, आंदोलकांवर १० हजार खटले भरण्यात आले आहेत. ते रद्द होण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली नाही. पंतप्रधानांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा विश्वास नाही, असे म्हणत शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मोदींवर प्रहार केला. तसेच, अद्यापही हे आंदोलन सुरूच असल्याचे त्यांनी सांगितले. आता, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला.
राकेश टिकैत गुरुवारी हैदराबादला गेलो होते, त्यावेळी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. विशेष म्हणजे औवेसी यांना उधळलेला बैल, अशी उमपा देत बोचरी टीकाही केली. तुमच्या इथला एक उधललेला बैल तुम्ही मोकाट सोडला आहे. तो भाजपची मदत करत असून त्याला इथंच बांधून ठेवा, असे टिकैत यांनी म्हटले. टिकैत यांनी औेवेसींचे नाव न घेता, त्यांच्यावर आणि एमआयएमवर टीका केली. तो बोलतो एक आणि करतो दुसरंच. त्यामुळे, त्याची चौकशी करायला हवी, त्याला बांधून ठेवा, हैदराबाद आणि तेलंगणाच्या बाहेर जाऊ देऊ नका. जर, तो बाहेर पडला तर भाजपलाच मदत करेल, हे देशाला माहित आहे. भाजप ए आणि हा भाजपची बी टीम असल्याचा आरोपही टिकैत यांनी केला.
हमी भावाचा कायदा करा
पंतप्रधान मोदी यांनी इतकीही गोड भाषा वापरू नये की ज्यापुढे मधही फिका पडेल. टीव्हीवरून घोषणा करताना मोदींनी जी मधाळ भाषा वापरली तीच त्यांनी शेतकऱ्यांशी बोलणी करतानादेखील कायम ठेवावी. तीन कृषी कायदे केंद्र सरकारने मागे का घेतले, याचे कारण आम्हाला माहिती नाही. मात्र, काही राज्यांत होत असलेल्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याची टीका होत आहे. किमान हमी भावासाठी कायदा करा, ही आमची मागणी कायम आहे. त्यासाठीही यापुढेही शेतकरी संघर्ष करत राहणार आहेत.