नाशिक : राज्य सरकारने महापालिकेच्या धर्तीवर जिल्हा परिषदेच्याही जागा वाढविण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे ग्रामीण जनतेसाठी मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचा विस्तार वाढणार आहे.
नाशिक जिल्हा परिषदेचे सध्याचे ७३ गट असून, पंचायत समितीचे १४६ गण आहेत. नाशिक जिल्ह्यात दोन महापालिका, आठ नगरपालिका, सात नगरपंचायती असून शहरी भाग वगळता ग्रामीण भागात जिल्हा परिषद हीच एकमेव मोठी संस्था कार्यरत आहे. सुमारे ४० लाख लोकसंख्येचे प्रतिनिधीत्व करतानाच त्यांच्या आरोग्य, शिक्षण, मूलभूत सुविधा, विकास कामांची जबाबदारी जिल्हा परिषदेवर निश्चित करण्यात आली असली तरी, पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायत, पंचायत समिती अशी रचना करण्यात आली आहे. साधारणत: चाळीस गावे मिळून एक जिल्हा परिषदेचा गट व पंचायत समितीच्या गणासाठी दहा ते बारा गावे गृहित धरण्यात आली आहेत. मात्र गेल्या दहा वर्षात ग्रामीण भागातील लोकसंख्याही वाढली आहे. त्या प्रमाणात मिनी मंत्रालयात प्रतिनिधीत्व वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
------------
जिल्हा परिषदेची पुढीलवर्षी निवडणूक
* नाशिक जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या विद्यमान सदस्यांची मुदत मार्च महिन्यात संपुष्टात येत आहे.
* सध्या राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक वेळेवर घेण्याच्यादृष्टीने प्रभाग रचना करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात निवडणुका होतील.
--------------
गट कुठे, किती वाढणार...
* नाशिक जिल्हा परिषदेच्या हद्दीतील लोकसंख्येचा विचार करता, त्याआधारे शासन निर्णयानुसार गटांची संख्या वाढणार आहे.
* प्रामुख्याने मालेगाव, नांदगाव, येवला, बागलाण या तालुक्यांमध्ये गटांची संख्या वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
-------------
पंचायत समित्यांची निवडणूक सोबतच
* जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबरोबरच पंचायत समित्यांची निवडणूक घेण्याचा आजवरचा प्रघात आहे.
* एका गटाच्या अखत्यारित दोन गण असतात. त्यामुळे या दोन्ही निवडणुकीसाठी मतदारांना दोन वेळा मतदान करावे लागते.
* नाशिक जिल्ह्यातील ओझर या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर केल्याने ओझरचा गट या निवडणुकीत नसेल. त्याऐवजी दुसरा गट तयार होईल.
------------
असे आहेत गट-गण...
* बागलाण- ७ - १४
* मालेगाव- ७ -१४
* देवळा- ३- ६
* कळवण- ४-८
* सुरगाणा- ३- ६
* पेठ- २-४
* दिंडोरी- ६- १२
* चांदवड- ४-८
* नांदगाव- ४-८
* येवला- ५-१०
* निफाड- १०-२०
* नाशिक- ४-८
* त्र्यंबकेश्वर- ३-६
* इगतपुरी- ५-१०
* सिन्नर- ६-१२
-------------
दहा वर्षांत जिल्ह्यात ५ टक्क्याने लोकसंख्या वाढली.
* सन २०११ च्या जनगणनेनुसार नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकसंख्या ३४,९९,७९२ गृहित धरली होती.
* सन २०२१ मध्ये जनगणना होऊ शकली नाही, परंतु एकूण जन्माचे प्रमाण पाहता, सुमारे पाच टक्के लोकसंख्या वाढीचा अंदाज धरण्यात आला आहे.