नाशिक : सोमवारी (दि.२१) दिवसभरात शहरात १०.२ मि.मी. इतका पाऊस झाला. एकूणच रविवारच्या तुलनेत पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात ओसरला. रविवारी संध्याकाळी सहा ते साडेआठ या दोन तासांमध्ये १० मि.मी. इतका पाऊस झाल्याची नोंद आहे. गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक सुरू दिवसभर सुरू होती. त्यामुळे जवळपास तीन हजार क्यूसेकपर्यंत विसर्ग गोदापात्रात केला जात असल्याने दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत संध्याकाळी पाण्याची पातळी कायम होती. गंगापूर धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली असून, रविवारी सकाळी ६ ते सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १३२मि.मी इतका पाऊस झाला. त्यामुळे ५१७३ दलघफूपर्यंत धरणाचा पाणीसाठा पोहचला आहे. धरण ९१.८८ टक्के भरले आहे. गंगापूरच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी दिवसभरात ४० मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली. एकूणच शहरासह ग्रामीणमध्येही पावसाचा जोर रविवारच्या तुलनेत ओसरला. तसेच दारणा धरणामध्ये सहा हजार ७७९ दलघफू इतका जलसाठा असून, धरण ९४.८२ टक्के भरले आहे. मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत जोरदार पाऊस शहर व परिसरात झाला. गंगापूर धरण समूहातही पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्गही घटल्याने गोदावरीची पातळी काही प्रमाणात कमी झाली.
गोदेच्या पातळीमध्ये अल्पशी घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:37 AM