नाशिक/अहमदनगर : केंद्र सरकारने कांद्यावरील ५५० डॉलर प्रतिटन किमान निर्यात मूल्य (मिनिमम एक्स्पोर्ट प्राइज) हटवत निर्यात शुल्कामध्ये २० टक्के कपात करताच कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील बाजारपेठांत कांद्याच्या दरात शनिवारी (दि. १४) सरासरी प्रति क्विंटल ५०० रुपयांनी वाढ झाल्याने कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.
मविआच्याच गळ्यात टाका ‘फेक नरेटिव्ह’; नड्डा यांचे भाजपच्या बैठकीत आदेश
केंद्र सरकारने कांद्यावरील ५५० डॉलर प्रतिटन किमान निर्यात मूल्य (मिनिमम एक्स्पोर्ट प्राइज) हटवत निर्यात शुल्कामध्ये २० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. वाणिज्य मंत्रालयाचे परदेश व्यापार महासंचालक संतोष कुमार सारंगी यांच्या स्वाक्षरीचा अध्यादेश शुक्रवारी (दि. १३) जारी झाला. सरकारने कांद्यावरील निर्यात मूल्याची अट काढून तसेच निर्यात शुल्कही निम्मे कमी करून २० टक्क्यांवर आणल्याने निर्यातदारांना हव्या त्या किमतीत कांदा निर्यातीची संधी आहे. हा निर्णय घोषित होताच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात चारशे रुपयांची वाढ झाली. मनमाडला कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल मागे ५०० ते ६०० रुपयांची वाढ झाली. चांदवडला कांद्याच्या दरात ३०० रुपयांची, तर सिन्नरला ४०० रुपयांची वाढ झाली.
नगरमध्ये विक्रमी ५५०० भाव
नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारातील कांदा मार्केटमध्ये शनिवारी उच्च प्रतीच्या गावरान कांद्याला क्विंटलला तब्बल ५५०० रुपये भाव मिळाला.
गेल्या अनेक दिवसांतील हा उच्चांकी भाव असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ऐन गणेशोत्सवात एकप्रकारे गणरायचा पावला आहे.
नेवासा बाजार समितीच्या घोडेगाव येथील उपआवारात कांद्याच्या भावामध्ये शनिवारी प्रतिक्विंटल पाचशे ते सातशे रुपयांची वाढ होऊन भाव पाच हजार दोनशे रुपयांवर पोहोचला.