नाशिक : महापालिकेच्या बस सेेवेसाठी पाच रुपये किमान दर हे हाफ तिकीटसाठी ठरवताना प्राैढांसाठी किमान भाडे १० रुपये ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय मंगळवारी (दि.२९) नाशिक महानगर परिवहन मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. हे दर सध्याच्या ‘रापम’एवढेच असणार आहेत. त्याचप्रमाणे पहिल्या टप्प्यात डिझेलवर चालणाऱ्या पन्नास बस या नऊ मार्गांवर (२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिनापासून धावण्यास प्रारंभ होणार आहे.
महापालिकेच्या बस कंपनीची वार्षिक बैठक मंगळवारी (दि. २९) अध्यक्ष तथा आयुक्त कैलास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. मुख्यालयात झालेल्या या बैठकीस संचालक तथा महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकूबाई बागुल, स्थायी समिती सभापती गणेश गीते, सभागृह नेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल, एस. टी. महामंडळाचे विभाग नियंत्रक नितीन मैंद तसेच अधिकारी उपस्थित होते.
एस.टी. महामंडळाच्या बस सेेवेचे चार किलोमीटरला १० रुपये भाडे असून नागरिकांना आकर्षित करण्यासाठी ते दोन किलोमीटरला पाच रुपये ठेवण्याचा प्रस्ताव होता. मात्र, नंतर तो बदलण्यात आला असून, दोन किलोमीटरला १० रुपये तर अर्धे तिकीट पाच रुपये असे किमान भाडे असेल. दोन ते चार किलोमीटरला १५ रुपये भाडे असेल. सध्या महामंडळाचे चार किलोमीटरला १० रुपये भाडे असून त्यापेक्षा महापालिकेचे दर जास्त असणार आहेत. शहरातील तपोवन आणि नाशिकरोड येथील बस डेपो सध्या कार्यान्वित करण्यात येणार असून तेथून नाशिकरोड ते पंचवटी, अंबड, पवन नगर तसेच पंचवटी येथूनदेखील नाशिकरोड, सिडको आणि सातपूर अशा महत्त्वाच्या एकूण नऊ मार्गांवरून ही सेवा असेल. पंचवटीतून पाच तर नाशिकरोडहून चार ठिकाणी ही सेवा सुरू होईल. त्यानंतर पाच टप्प्यांत ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. डिझेल बस मिनी प्रकारातील असून दाेनशे सीएनजी बस आहेत. परंतु सीएनजी पंपाचे काम सध्या सुरू असल्याने सध्या डिझेल बस सुरू होतील.