नाशिक : शहराच्या किमान तपमानाचा पारा सलग दोन दिवस दहा अंशावर असल्यामुळे नाशिककर गारठले होते.मंगळवारी (दि.१४) नाशिककरांना काहीसा दिलासा मिळाला. कारण तपमानाचा पारा एक अंशाने वर सरकल्याने ११.४ अंश इतके तपमान नाशिकच्या पेठरोडवरील हवामान निरिक्षण केंद्राने नोंदविले. नोव्हेंबर महिन्याचा पंधरवड्याचा विचार करता गत वर्षाच्या तुलनेत यावर्षी थंडीचा कडाका कमी राहिल्याचे दिसून येते.शहराचा गेल्या रविवारी पारा थेट १०.४ अंशापर्यंत घसरल्याची नोंद झाल्याने राज्यात निचांकी तपमनाची नोंद नाशिकमध्ये झाली. नाशिकमध्ये थंडीचा जोर वाढत असून नाशिककरांनी उबदार कपड्यांचा आधार घेण्यास सुरूवात केली आहे. सोमवारी पा-यामध्ये ०.२ने घसरण होऊन १०.२ अंशावर पारा पोहचला; मात्र मंगळवारी ११.४ अंशापर्यंत पारा वर सरकल्याने काहीसा दिलासा मिळाला.राज्यात उस्मानाबाद शहराचे मंगळवारी राज्यात निचांकी ११.३ अंश किमान तपमान नोंदविले गेले तर नाशिकचे किमान तपमान ०.१अंशाने यादिवशी अधिक राहिले. एकूणच नाशिकमध्ये सध्या थंडीचा कडाका अधिक जाणवत आहे. गेल्या वर्षी बालदिनाला शहराचे तपमान १२.३ अंश इतके नोंदविले गेले होते. त्या तुलनेत यावर्षी बालदिनाला थंडी अधिक राहिली; मात्र या चालू आठवड्याची तुलना गेल्या वर्षाच्या ७ ते १४ या आठवड्याशी केली तर मागील वर्षी थंडीचा कडाका अधिक राहिल्याचे किमान तपमानाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. एकूणच पुढील आठवड्यात मात्र पारा अधिक घसरण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविली जात आहे. मंगळवारी तपमानाचा पारा काहीसा वर सरकला असला तरी पहाटेपासून नाशिककरांना थंडी जाणवत होती. त्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजेपासून पुन्हा थंडीचा जोर वाढण्यास सुरूवात झाली. रात्री गोदाकाठावर शेकोट्या पेटवून मजुरी करणा-या कुटुंबियांनी थंडीपासून स्वत:चा बचाव करताना दिसून आले.
राज्यात प्रमुख शहरांमध्ये नोंदविले गेलेले किमान तपमान अंश सेल्सिअसमध्ये ...महाबळेश्वर १३, सातारा १२, नाशिक ११.४, उस्मानाबाद११.३, सांगली १४, पुणे ११.६, अहमदनगर ११.७, कोल्हापूर १५.५, मालेगाव १४.५, सोलापूर १३.७, नांदेड १४, अकोला १४, बुलढाणा १५.२, नागपूर १३.५, वाशिम १४.६, यवतमाळ १४