मालेगाव महापालिकेची महासभा महापौर ताहेरा शेख, उपमहापौर नीलेश आहेर यांच्या अध्यक्षतेखाली व उपायुक्त नितीन कापडणीस, नगरसेवक श्याम बुरकुल यांच्या उपस्थितीत पार पडली. महासभेच्या प्रारंभी दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर विषय पत्रिकेवरील बरंठ मळ्याच्या आरक्षित जागा संपादित करण्याचा विषय चर्चेला आला. जागा मालकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून जमीन संपादित करण्याचा अहवाल शासकीय नगर रचनाकार यांनी दिला असल्याने प्रशासनाने भूसंपादनाचा प्रस्ताव महासभेपुढे ठेवला होता. या विषयावरून नगरसेवक सुनील गायकवाड, रशीद शेख, डॉ. खालीद परवेझ यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाली. प्रशासनाने न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे निर्णय घ्यावा, असे नगरसेवकांनी सांगितले. महापालिकेचा २०१५-१६ चा लेखापरीक्षण अहवाल महासभेपुढे सादर करण्यात आला. मोकळा भूखंड दिव्यांग संस्थेस देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. सुवर्ण जयंती नगरोत्थान योजने अंतर्गत नगरसेवकांना प्रस्तावित केलेली कामांना मंजुरी देण्यात आली. महासभेच्या चर्चेत उपमहापौर आहेर, नगरसेवक मदन गायकवाड, अस्लम अन्सारी, खालीद परवेझ, सखाराम घोडके आदिंनी भाग घेतला.
इन्फो
साडेआठ लाखांचा बोजा
महापालिका हद्दवाढीनंतर १०८ कर्मचाऱ्यांचे महापालिकेत समायोजित करण्यात आले होते. मात्र शासनाने १०८ कर्मचाऱ्यांपैकी २०१२ मध्ये ४९ कर्मचाऱ्यांनाच किमान वेतन देण्यास मान्यता दिली होती. उर्वरित ४९ कर्मचाऱ्यांना महापालिकेची आर्थिक स्थिती पाहून किमान वेतन अदा करण्याचा अभिप्राय शासनाने दिला होता. ४७ कर्मचाऱ्यांना किमान वेतन अदा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महासभेने घेतला आहे. या कर्मचाऱ्यांना यापूर्वी मासिक ३ लाख रुपये वेतन अदा केले जात होते. आता किमान वेतनानुसार महापालिकेला मासिक साडेआठ लाख रुपये वेतन अदा करावे लागणार आहेत.
इन्फो
गोंधळातच सदस्य निवड
स्थायी समिती सदस्यपदी महागठबंधन आघाडीने सादर केलेल्या जकियाबी शेख नजीरूद्दीन यांचे नाव महापौर ताहेरा शेख घोषित केले. यावेळी महापौर शेख यांनी तत्कालीन निवड प्रक्रियेवेळी जनता दलाकडून नाव राहून गेल्याचा उच्चार करताच जनता दलाच्या नगरसेविका शान - ए - हिंद, मुस्तकीम डिग्निटी यांनी आक्षेप घेतला. या गोंधळातच नाव जाहीर करण्यात आले.