त्र्यंबकेश्वर : येथील नगर परिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांना यापुढे किमान वेतन व अन्य सुविधा देण्यात येणार आहेत. याबाबत नगर परिषदेचे पदाधिकारी, कंत्राटी सफाई कामगारांचे नेते व यापूर्वी ठेका घेतलेले कंत्राटदार यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये इबी इन्व्हायरोवगळता अन्य कंत्राटदार हजर होते, तर इबी इन्व्हायरो कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते. त्यांना मुख्याधिकारी नोटीस पाठवणार असल्याचे कळते. त्र्यंबक नगर परिषद कंत्राटी सफाई कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. यावेळी पालिकेने लेखी आश्वासन देऊन आंदोलन थांबविले होते. दि.१० रोजी बैठकीचे नियोजन करण्यात येईल, असे ठरले होते. त्यानुसार झालेल्या बैठकीत विविध मागण्या मंजूर करण्यात आल्या. नियमाप्रमाणे शासकीय सुटी देण्यात येईल. तसेच दिशा एजन्सीने १० दिवसाचा पगार देण्याचे मान्य केले. यावेळी अनिल भंडागे, अनिता बागुल, नगरसेवक विष्णू दोबाडे, कैलास चोथे आदी उपस्थित होते.--------------------------मास्क निकृष्ट दर्जाचेयामध्ये कामगारांना किमान वेतन देणे, महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन कालावधीत लागू केलेला प्रोत्साहन भत्ता विमा सवलतीबाबत नगर परिषदेने सकारात्मक भूमिका घेतली तसेच सफाई कामगारांना हॅण्ड ग्लोज, गमबूट, मास्क निकृष्ट दर्जाचे देण्यात येतात त्याबाबत ठेकेदाराला सूचना देऊन चांगल्या प्रतिच्या वस्तू देण्याचे आदेश देण्यात आले. घरकुल योजनेबाबत नगरसेवक स्वप्निल शेलार यांनी ज्या सफाई कामगारांकडे जागा असेल त्यांना तत्काळ घरकुल मंजूर केले जाईल, असे आश्वासन दिले तर यापुढे नियमितपणे कामगारांना पगार स्लीप देण्याचे ठेकेदाराने कबूल केले.
त्र्यंबक पालिकेच्या कंत्राटी कामगारांना किमान वेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 9:08 PM