उपमुख्यमंत्री अजित पवारांविषयी मी फार बोलणार नाही. पण मला प्रश्न आहे तो बाकीच्या नेत्यांचा आहे. बाकीचे नेते का गेले? राज्यात १५ वर्षे सत्ता होती तेव्हा यातल्या नेत्यांना पदं देण्यात आली होती तरीही ते का गेले?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी उपस्थित केला. तसेच मंत्री छगन भुजबळ यांच्यावर देखील रोहित पवारांनी निशाणा साधला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नाशिकच्या अनेक आठवणी सांगत असतात. शरद पवार येवल्यात अन्याय झालेल्यांना आशीर्वाद देण्यासाठी येणार आहेत. पवारांची आशीर्वाद देण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. त्यांनी दिलेल्या आशीर्वादाचे भविष्यात चांगले परिणाम दिसतील अशी टीका आमदार रोहित पवार यांनी छगन भुजबळांवर केली आहे. या टीकेला आता छगन भुजबळ यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.
मी १९८५मध्ये महापौर आणि आमदार झालो, त्यानंतर चार महिन्यांनी तुमचा (रोहित पवार) जन्म झाला. मला मोठं केलं, मोठं केलं, अशा फालतू गोष्टी करू नका, इतिहास जाणून घ्या, असा निशाणा छगन भुजबळ यांनी रोहित पवारांवर साधला. जास्त काही मी त्यांना किंमत देत नाही. त्यांच्या मतदारसंघात जाऊन मी त्यांना उत्तर देईल, असंही छगन भुजबळ यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान, २००४ मधून उमेदवारीसाठी एरंडोल, वैजापूर, मुंबई, जुन्नर, लासलगाव आणि येवला येथूनही आपणाला विचारणा केली जात होती. येवल्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीदेखील आपणास येवल्याच्या विकासासाठी लढण्याचा आग्रह धरला होता. त्यावेळी पवार यांनी आपणास जुन्नर मतदारसंघातून लढण्याचा सल्ला दिला होता. परंतु मी येवल्यातून लढण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेचे प्राबल्य असताना या मतदारसंघातून लढण्याची रिस्क घेतली आणि निवडून आलो. त्यामुळे शरद पवारांनी आपणास येथून उमेदवारी दिली असे नाही तर मी स्वता:च येवल्याची निवड केली होती, असे स्पष्टीकरण भुजबळ यांनी यावेळी दिले. येवल्यातील विकासाचे कौतुक स्वत: शरद पवार यांनी केले होते. याचा विसर त्यांना पडल्याचे भुजबळ म्हणाले.