नाशिक - शिंदे गटातील नेते आणि राज्याचे मंत्री दादा भुसे हे शांत-संयमी दिसून येतात. माध्यमांशी संवाद साधतानाही त्यांच्यातील संयमी बाणा आणि मुद्देसूदपणे बोलणे हाच त्यांचा ठायी स्वभाव वाटतो. मात्र, त्यांच्यातील धाडसी व्यक्तीमत्त्वाचे दर्शन नाशिककरांसह महाराष्ट्राला ऐन दिवाळीत घडली. कारण, हातात पिस्तूल घेऊन दरोडा टाकण्यासाठी बंगल्यात घुसलेल्या दरोडेखोराला चक्क पालकमंत्री दादा भुसे यांनी पकडले. त्यानंतर, सहकाऱ्यांच्या मदतीने स्थानिक पोलिसांच्या स्वाधीनही केले. मालेगावच्या कलेक्टर पट्टा भागात ही घटना घडली.
मालेगाव पट्टा भागात भरदिवसा दरोड टाकण्याच्या, चोरी करण्याच्या उद्देशाने दोन-तीन जण आले होते. त्यावेळी, पालकमंत्री दादा भुसे यांनी धाडस दाखवून त्यातील एका पिस्तुलधारी दरोडेखोराला पकडले. मंत्री भुसेंनी दाखवलेल्या धाडसामुळे बंगल्यातील ३ महिलांचा जीव वाचला आहे. दरोडेखोराला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
लक्ष्मीपूजन असल्यामुळे बंगल्यात मोठ्या प्रमाणात दागिने, रोख रक्कम असेल, असा अंदाज लावून एक चोरटा दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हातात पिस्तूल घेऊन दोषी यांच्या बंगल्यात घुसला होता. घरातील महिलांना पिस्तूलचा धाक दाखवून त्याने दागिन्यांची मागणीही केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे महिलांमध्ये भीती पसरली आणि त्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून काही नागरिक गोळा झाले. विशेष म्हणजे त्याच भागात पालकमंत्री दादा भुसे देखील आलेले होते. त्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी थेट बंगल्याकडे धाव घेतली आणि चोरट्याला शरण येण्याचे आवाहन केले. तब्बल दोन तासानंतर लपलेला चोरटा शरण आला त्याला कार्यकर्त्यांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केलं.
यावेळी दादा भुसेंनी चोरट्याला चांगलाच दमही भरला. तुझ्यासोबत असलेले दोन-तीन जण कोण होते, त्यांची नावे सांग, असे म्हटले. त्यावर, मी एकटाच आहे, माझ्यासोबत कोणीही नाही, असे उत्तर चोरट्याने दिले. मात्र, दादा भुसेंना त्याला दम देत, महागात पडेल...अशा शब्दात सुनावत पोलिसांच्या स्वाधानी केले.