नाशिक : जिल्हा नियोजन मंडळाच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेतून निवडून द्यावयाच्या २३ जागांसाठी ३६ उमेदवार इच्छुक असून, शिवसेनेकडे संख्या वाढल्याने गुरुवारी (दि.७) शिवसेनेच्या नेत्यांना इच्छुकांच्या माघारीसाठी मनधरणी करावी लागल्याचे चित्र होते. शिवसेनेला संख्याबळानुसार ९ जागा मिळणार असून, १७ इच्छुकांनी अर्ज भरल्याने सेनेची डोकेदुखी वाढली आहे.गुरुवारी दिवसभर शिवसेना, राष्टÑवादी, भाजपा, कॉँग्रेस, माकप व अपक्षांची जिल्हा नियोजन मंडळाच्या निवडणुकीसाठी चर्चा सुरू होती. शिवसेनेचे संख्याबळ २७ असून, अपक्ष शंकरराव धनवटे यांनी शिवसेनेचे सहयोगी सदस्यपद स्वीकारले आहे. तीन जिल्हा परिषद सदस्यांमागे एक जागा जिल्हा नियोजन मंडळासाठी निवड करण्याच्या सूत्रानुसार शिवसेनेच्या कोट्यात नऊ जागा येत आहेत. प्रत्यक्षात २७ पैकी शिवसेनेच्या १७ जिल्हा परिषद सदस्यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने शिवसेनेची माघारीसाठी दिवसभर धावपळ सुरू होती. राष्टÑवादीचे संख्याबळ १८ असून, गणेश अहिरे यांनी सहयोगी सदस्यपद स्वीकारल्याने राष्टÑवादीला ६ जागांचा कोटा आहे. ७ उमेदवारांनी फॉर्म भरल्याने राष्टÑवादीच्या एकाला माघार घ्यावी लागेल. भाजपाच्या कोट्यात ५ जागा असून, ८ उमेदवारांनी ११ अर्ज भरले आहेत. भाजपाला तीन जणांच्या माघारी घ्याव्या लागणार आहे. कॉँग्रेसला दोन जागा वाट्याला आल्या असून, तीन उमेदवारांनी फॉर्म भरले आहेत. माकपाच्या संख्याबळानुसार त्यांना एक जागा असून, माकपाच्या वतीने रमेश बरफ यांनी अर्ज भरला आहे.
नियोजन मंडळासाठी मिनी मंत्रालयात ‘जोर-बैठका’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 12:03 AM