नाशिक : वडिलांच्या सततच्या मारहाणीमुळे त्रस्त झालेल्या अल्पवयीन मुलीने मदतीसाठी फोन करून बोलावलेल्या तरुणाने तिची सुटका केल्यानंतर तिला सोबत नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले़ या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या अपहरण, बलात्कार व पोस्कोच्या गुन्ह्यातील आरोपी भीमराज वामन पडेर (वय २०, रा़ सय्यदपिंप्री रोड, श्ािंदे वस्ती, आडगाव़ मूळ राहणार कोहोर, ता़ पेठ, जि़ नाशिक) यास वैधानिकतेच्या मुद्द्यावर जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला फलके-जोशी यांनी शुक्रवारी (दि़ ७) सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ आडगाव परिसरातील एका तेरावर्षीय मुलीस तिचे वडील सतत मारहाण करीत असल्यामुळे ती त्रस्त होती़ २२ मे २०१४ रोजी या वडिलांनी बेदम मारहाण केल्यानंतर या मुलीने ओळखीचा भीमराज पडेर याच्या मोबाइलवर फोन करून सुटका करण्यास सांगितले़ त्यानुसार पडेर याने या मुलीची सुटका करून तिला सुतारपाडा तसेच वापी या ठिकाणी घेऊन गेला़ सुमारे २० दिवस या मुलीसोबत राहणाऱ्या पडेर याने तिच्यासोबत शारीरिक संबंधही प्रस्थापित केले़ दरम्यान, मुलीच्या वडिलांनी आडगाव पोलीस ठाण्यात मुलगी हरविल्याची फिर्याद दिली होती़ आडगाव पोलिसांनी गुजरातमधील वापी येथून या दोघांनाही ताब्यात घेतले होते़ या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पडेरवर अपहरण, बलात्कार तसेच लहान मुलांचे बाललैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता़ मुलीस आरोपीने तिच्या संमतीने नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले असले तरी ती अल्पवयीन असल्याने कायदेशीरदृष्ट्या संमती देण्यास पात्र नव्हती़ वैधानिकतेचा विचार करता आरोपीने तिला पोलीस वा सामाजिक संस्थेच्या ताब्यात देणे गरजेचे होते, मात्र त्याने तसे केले नाही़ त्यामुळे न्यायालयाने आरोपी पडेर यास सात वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्षाचा कारावासाची शिक्षा सुनावली़ या खटल्यामध्ये सरकारी वकील दीपशिखा भिडे-भांड यांनी पाच साक्षीदार तपासून सबळ पुरावे सादर केले़ जिल्हा न्यायालयाने वैधानिकतेच्या मुद्द्यावर अपहरण, बलात्कार व पोस्को या गुन्ह्यामध्ये दिलेला जिल्ह्यातील हा पहिलाच निकाल आहे़ (प्रतिनिधी) कायदेशीरदृष्ट्या सज्ञान (१८ वर्षांवरील) व सुज्ञ व्यक्तीने त्याच्यावरील वैधानिक जबाबदारी पार पाडणे कायद्यास अभिप्रेत आहे़ या खटल्यातील पीडित कायदेशीरदृष्ट्या अल्पवयीन असून, आरोपी सज्ञान आहे़ वडिलांच्या मारहाणीपासून सुटका करण्यासाठी फोन करून बोलावल्याने आरोपीने तिची सुटका केली, त्यानंतर तिला पोलीस वा लहान मुलांसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संघटनांच्या (चाइल्ड लाइन) ताब्यात देणे गरजेचे होते़ मात्र, तसे न करता आरोपीने तिला सोबत नेले व शारीरिक संबंधही ठेवले़ न्यायालयाने या खटल्यात वैधानिक जबाबदारीच्या मुद्द्यावर आरोपीस सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ - दीपशिखा भिडे-भांड, सरकारी वकील़ जिल्हा न्यायालय़
अल्पवयीन मुलगी अत्याचार प्रकरणी सक्तमजुरी
By admin | Published: October 08, 2016 1:51 AM