नाशिक : अवघे तेरा वर्षे तीन महिन्यांचे वय असलेल्या अल्पवयीन मुलीचा विवाह कोरोना कालावधीत बेकायदेशीररीत्या गुपचूप उरकणाऱ्या चार संशयितांविरोधात वणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीचा अपघात झाल्यानंतर हे पितळ उघडे पडल्याने विवाह जुळवून आणणारे अडचणीत सापडले आहेत. याबाबत माहिती अशी की, दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील एका मुलीचे वय १३ वर्ष ३ महिने असताना इगतपुरी तालुक्यातील घोटी खंबाळवाडी येथील बावीस वर्षीय मुलाशी २ मे २०२० रोजी कोरोना कालावधीत गुपचूप विवाह उरकण्यात आला होता. दरम्यानच्या कालावधीत दिनांक २४ नोव्हेंबर २०२० रोजी करंजवण येथे ज्यांच्या घरात हा विवाह गुपचूप उरकण्यात आला, त्यांचे निधन झाले. त्यामुळे मुलाकडील मंडळी सांत्वनासाठी दारावर आली होती. त्यात सदर अल्पवयीन विवाहित मुलगीही होती. पहाटेच्या सुमारास अंघोळीसाठी तापविण्यात आलेल्या गरम पाण्याचा ड्रम सांडल्याने अल्पवयीन विवाहित मुलीसह आणखी एक जण जखमी झाली. त्यांना दिंडोरीच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून नाशिकच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यादरम्यान पोलिसांना या प्रकरणाची कुणकुण लागली व बालविवाहासंदर्भात माहिती मिळाल्याने करंजवणचे ग्रामविकास अधिकारी अरुण आहेर यांना चौकशी करण्यास सूचित केले. चौकशीअंती त्यात तथ्य आढळून आले. दरम्यान जखमी अवस्थेतील मुलीचा जबाब पोलिसांनी घेतला असता तिने आपला विवाह आठ महिन्यांपूर्वी झाल्याची धक्कादायक माहिती दिली व सद्य:स्थितीत तिचे वय १३ वर्षे ३ महिने असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस यंत्रणाही चक्रावली. तपासाची सूत्रे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांनी हाती घेत प्रकरणाची सखोल चौकशी केली असता सदर बालविवाहाचा प्रकार पुढे आला.पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखलबालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये मुलीचे वय विवाहासाठी योग्य नसताना कोरोना कालावधीत बालविवाह विधी केल्याने लखमापूर येथील मुलीची आई जोती पितांबर जाधव, घोटी खंबाळवाडी येथील पती किरण बिडवे, सासरे संजय बिडवे, सासू संगीता बिडवे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून बालविवाह प्रतिबंधक कायदा असतानाही हे धाडस केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अल्पवयीन मुलीचा गुपचूप बालविवाह गुन्हा दाखल : अपघातामुळे पितळ उघडे पडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 12:24 AM