नाशिक : नागपूर शहरातून तिघे अल्पवयीन मुले घरातून पळून जाऊन एका रेल्वेतून शहराबाहेर जाण्यासाठी प्रवास करत होते. याबाबतचा संदेश प्राप्त होताच, नाशिक रोड रेल्वे स्थानकावर आलेली गीतांजली एक्स्प्रेस (क्र.०२२६०) रेल्वे सुरक्षा बलाच्या संयुक्त पथकाने (आरपीएफ व जीआरपीएफ) पिंजून काढत, तिघांना एस-४ क्रमांकाच्या कोचमधून ताब्यात घेत सुरक्षितरीत्या स्थानकावर उतरवून घेण्यात आले.नागपूरच्या गोपालनगर येथील रहिवाशी असलेले १५ ते १६ वर्षे वयोगटांतील तिघेही मित्र अचानकपणे त्यांच्या राहत्या घरातून कोणाला काहीही न सांगता निघून गेले होते. तिघा अल्पवयीन मुलांच्या नातेवाइकांनी त्यांचा परिसरात सर्वत्र शोध घेतला. मात्र, ते कोठेही आढळून न आल्याने त्यांनी नागपूर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. यानुसार, तिघे मुले बेपत्ता झाल्याची तक्रार प्रतापनगर पोलिसांनी नोंदवून घेत, त्यांची छायाचित्रे, आधार्ड कार्डाचे फोटो काढून घेत, ते सर्व पोलीस ठाण्यांसह रेल्वे पोलिसांना तत्काळ व्हायरल केले. या छायाचित्रांवरून या तिघा मुलांचा पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाकडून शोध सुरू झाला. दरम्यान, शनिवारी (दि.१३) हा संदेश नाशिक रेल्वे पोलिसांपर्यंत येऊन धडकला. रेल्वे सुरक्षा दल व गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले.
या पथकाने गीतांजली एक्स्प्रेसची झडती घेण्यास सुरुवात केली. जळगाव सोडल्यानंतर या रेल्वेच्या एका बोगीत ही तिन्ही मुले बसलेली पथकाला आढळून आली. त्यांनी मोबाइलमध्ये असलेल्या छायाचित्रांवरून त्यांची ओळख पटवून त्यांना विश्वासात घेतले. नाशिकरोड येथे संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गीतांजली एक्स्प्रेस पोहोचताच या मुलांना पथकाने सुखरूपपणे उतरवून आरपीएफ पोलीस ठाण्यात आणले. तेथून नागपूर प्रातपनगर पोलिसांना याबाबत वरिष्ठ रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांकडून तिन्ही मुले सापडल्याची माहिती कळविण्यात आली.
या तीनही मुलांना रेल्वे पोलिसांनी सुरक्षितरीत्या बाल कल्याण समितीकडे सोपविले. दरम्यान, या तीनही मुलांचे पालक नाशकात आल्यानंतर, समितीकडून पुढील कार्यवाही करून तिघांना त्यांच्या पालकांकडे सोपविले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.