- संजय शहाणे इंदिरानगर /नाशिक - फाळके स्मारकलगत असलेल्या समांतर रस्त्यावर काही अल्पवयीन टवाळखोरांनी एका व्यक्तीला चाकूचा धाक दाखवून मोबाईल लुटल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अवघ्या तासाभरातच संशयितांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांनी लुटलेला मोबाईलही पोलिसांनी हस्तगत केला. मात्र या प्रकरणातील सर्व संशयित हे अल्पवयीन असल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन कुमार बरसाती कश्यप (२४, रा. कंपनीच्या कामगार रूम, अंबड, मूळ- नवाबमन उत्तर प्रदेश) हा व त्याचा काका बाबूलाल कश्यप सोमवारी (दि.१७) सकाळी साडेनऊ वाजता नाश्ता करण्यासाठी फाळके स्मारकच्या बाजूला असलेल्या समांतर रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी समोरून १७ ते १८ वयोगटातील दोन मुले त्यांच्याजवळ आले. त्यांनी बाबुलाल कश्यप यांना चाकू दाखवून पैशे आणि मोबाईलची मागणी करीत शिवीगाळ केली.त्यामुळे घाबरून गेलेल्या अर्जुनकुमार यांने खिशातील सुमारे दहा हजार रुपयांचा मोबाईल त्यांना दिला. त्यानंतर दोघा संशयितांनी घडलेला प्रकार पोलिसांना सांगितल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
त्यामुळे कश्यप घाबरून घरी निघून आले. त्यांनी घडलेला प्रकार भावाला सांगितला. त्यानंतर इंदिरानगर पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षण नितीन पगार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलिस निरीक्षक शंकर सिंह राजपूत, प्रभाकर पवार, सौरभ माळी, विशाल पाठक यांनी पांडवलेण्याच्या पायथ्याच्या परिसरातच सापळा रचून दोन्ही अल्पवयिन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे दहा हजार रुपयांचा मोबाईल हस्तगत केला