नाशिक : आर्थिक व सोने तारणावर जादा व्याजाचे अमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेले मिरजकर सराफचे संचालक महेश मिरजकर, किर्ती नाईक व अकौंटंट प्राजक्ता कुलकर्णी या तिघांच्याही पोलीस कोठडीत गुरुवार(दि़९)पर्यंत तर यापुर्वी अटक केलेला आशुतोष चंद्रात्रेच्या पोलीस कोठडीत मंगळवार (दि़७)पर्यंत न्यायालयाने वाढ केली आहे़ आतापर्यंत ५२० गुंतवणूकदारांचे जबाब पूर्ण झाले असून फसवणूकीची रक्कम ११ कोटी तर तारण ठेवलेले १८ किलो सोन्याचे पाच कोटी अशी १६ कोटींपर्यंत पोहोचली आहे़
पोलिसांनी महेश मिरजकरच्या घराची झडती घेऊन १६ किलो चांदी व गुंतवणूकदारांचे एक हजार पाचशे कार्ड जप्त केल्याची माहिती न्यायालयात दिली आहे़ त्यामुळे मिरजकर व त्रिशा या दोन्ही ठिकाणी एक हजार पंधराशे गुंतवूणकदारांनी गुंतवणूक केल्याचे सद्यस्थितीत दिसून येते़ या दोन्ही फर्म तसेच संचालकांच्या बँक खात्यातही मोठी उलाढाल झाली असून फसवणुकीचा आकडा आणखीण वाढण्याची शक्यता आहे़ या गुन्ह्यातील उर्वरीत फरार संचालक हर्षल नाईक, माजी नगरसेवक अनिल चौघुले, श्रेयस आढाव, परीक्षित औरंगाबादकर, सुरेश भास्कर, भारत सोनवणे, वृषाली नगरकर, विजयदीप पवार या फरार संचालकांचा शोध तसेच गुंतवूकदारांची संख्या व रक्कम यासाठी पोलीस कोठडीची मागणी जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात केली होती़
न्यायालयात महेश मिरजकरच्या वकीलांनी या गुन्ह्यातील प्रमुख सूत्रधार हा हर्षल नाईक असल्याचे सांगितले़ तर हर्षल नाईकची अटक केलेली पत्नी किर्ती नाईक ही गृहीणी असून मिरजकर व त्रिशा फर्मची अकौटंट प्राजक्ता कुलकर्णी ही आजारी असल्याचा बचावात्मक पवित्रा न्यायालयात घेतला होता़ मात्र, जिल्हा सरकारी वकीलांनी तपासासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचे सांगितल्याने पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली़ दरम्यान, संचालक महेश मिरजकर याच्या घराची तपासणी करण्यात आली असून त्याची कारही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे़५२० गुंतवणूकदारांचे जबाबमिरजकरच्या फसवणूकीत ५२० गुंतवणूकदारांचे जबाब नोंदविण्यात आले असून फसवणुकीचे रक्कम सुमारे १६ कोटींपर्यंत पोहोचली आहे़ मिरजकरच्या घरातून १६ किलो चांदी व त्याची कारही जप्त करण्यात आली आहे़ मिरजकर व त्रिशा जेम्सची दोन्ही दुकानांची जागा भाडोत्री असून संबंधित गाळे मालकास कळविण्यात आले आहे़ मंगळवारी या दोन्ही दुकानाची झडती घेतली जाईल़- भागवत सोनवणे, सहायक पोलीस आयुक्त, नाशिक़