नाशिक : निवडणुकीत विरोधकांकडे ठोस मुद्दे नसल्याने कोणतेही पुरावे न देता केंद्रातील भाजपा सरकारवर रोज खोटे आरोप केले जात आहेत. कांदा निर्यातबंदीबाबतही अशीच दिशाभूल केली जात असून, सरकारने मात्र कांदा निर्यातीवर कोणताही प्रतिबंध लावला नसल्याची स्पष्टता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील जाहीर सभेत बोलताना केली. जोरदार पावसामुळे गेल्या रविवारी रद्द करण्यात आलेली पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा मंगळवारीही बरसलेल्या पावसामुळे होईल की नाही याची अनिश्चितता असताना, भर पावसातही जनसमुदाय उपस्थित राहिल्याने अखेर सभा झाली आणि मोदी यांनीच साऱ्या अनिश्चिततेला पूर्णविराम दिला. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी गेल्या १५ वर्षांतील कॉँग्रेस आघाडी सरकारचा भरपूर समाचार घेतला. मोदी यांनी सभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करताना सांगितले, कांद्याचे दर घसरले तेव्हा विरोधकांनी मोदी सरकारकडून निर्यातीवर बंदी घातल्याची अफवा पसरविली; परंतु हे शतप्रतिशत खोटे असून, केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी केलेली नाही. यापूर्वी केंद्रात शरद पवार कृषिमंत्री असताना त्यांनी चार वेळा कांद्यावर निर्यातबंदी लावली होती. कॉँग्रेसवाले नेहमीच खोटे बोलत आले आहेत; परंतु कांदा असो अथवा कापूस, उत्पादकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळवून देण्यात आम्ही कटिबद्ध आहोत. केंद्रात कॉँग्रेसने साठ वर्षे कारभार केला; परंतु त्यांनी कधी हिशेब दिला नाही. माझ्याकडून मात्र साठ दिवसांचा हिशेब मागत आहेत. केंद्रात भाजपाचे सरकार आल्यानंतर पेट्रोल, डिझेल दर कमी झाले, महागाई कमी झाली. महागाईचा पारा रोखला. आता तो आणखी खाली उतरेल. कॉँग्रेसने साठ वर्षांत कारभाराचा हिशेब दिला नाही; परंतु मी क्षणाक्षणाचा आणि पै-पैचा हिशेब देईल. पाच वर्षे पूर्ण होतील तेव्हा सरकारचा हिशेब जनतेसमोर मांडण्यात येईल, असे अभिवचनही नरेंद्र मोदी यांनी दिले. यावेळी मोदी यांनी जपान, अमेरिका दौऱ्यानंतर भारतात होणाऱ्या गुंतवणुकीची माहिती देत महाराष्ट्राचाही दुनियेत डंका वाजविण्यासाठी भाजपाला पूर्ण बहुमत देण्याचे आवाहन केले. महाराष्ट्रात सुरू असलेल्या एलबीटीबाबतही बोलताना मोदी यांनी हा लूटो-बॉँटो टॅक्स असल्याची खिल्ली उडविली. या लुटीपासून महाराष्ट्राला वाचवा, असे आवाहनही मोदी यांनी केले.
कांदा निर्यातबंदीबाबत विरोधकांकडून दिशाभूल
By admin | Published: October 08, 2014 12:30 AM