संजय पाठक, नाशिक: विधान परीषदेच्या नाशिक विभागीय शिक्षक संघात महायुतीत गोंधळाचे वातावरण आहे. शिंदे सेनेने विद्यमान आमदार किशोर दराडे यांना उमेदवारी दिली असून अजित पवार गटाने महेंद्र भावसार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे प्रचार कोणाचा करायचा अशा संभ्रमात कार्यकर्ते असतानाच शनिवारी (दि.१५) पालकमंत्री दादा भुसे यांनी किशोर दराडे यांच्या बैठकीसाठी बेालवलेल्या बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सिन्नर येथील आमदार माणिकराव कोकाटे आणि देवळाली येथील आमदार सरोज आहिरे उपस्थित होत्या, त्यामुळे गोंधळ अधिकच वाढला. मात्र ही शिंदे सेनेच्या प्रचारासाठी ही बैठक असल्याची कल्पनाच देण्यात आली नव्हती असा दावा राष्ट्रवादीच्या आमदारांनी केला आहे.
नाशिकच्या एका हॉटेलमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांनी ही बैठक बोलावली होती. या बैठकीस राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दांडी मारल्याने तो चर्चेचा विषय ठरला होता. भुजबळ यांनी आपल्या येवला मतदार संघात नियोजीत कार्यक्रम आणि बैठका घेतल्याने ते उपस्थित राहु शकले नाही असा दावा शिंदे सेनेकडून करण्यात आला तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने मुळातच महेंद्र भावसार यांना उमेदवारी दिली असल्याने जाण्याचा प्रश्नच नव्हता असे स्पष्टीकरण भुजबळ यांनी दिले. मात्र, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदार सरोज आहिरे यांनी मात्र, ही बैठक शिक्षक मतदार संघासाठी होती हे माहिती नव्हते आणि तसे सांगण्यात देखील आले नव्हते. पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थित बैठक आहे, असे सांगितल्यानंतर कदाचित प्रलंबीत कामे किंवा लोकसभा निवडणूकीतील पराभवासंदर्भात बैठक असेल असे वाटल्याने आपण तेथे गेलो होतो, असे आमदार सरोज आहिरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.