गेल्या तीन वर्षात म्हणजेच २०१८ ते २०२१ या कालावधीत रेशन दुकानदारांविरुद्ध आलेल्या तक्रारींच्या आधारे पुरवठा विभागाने नियमित आणि अकस्मात अशा दोन्ही प्रकारे दुकानांची तपासणी केली. तथ्य आढळणाऱ्या दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्याबरोबरच थेट अटक करण्यापर्यंतचे धाडसही दाखविले गेले. एव्हढी मोठी कारवाई करताना पुरवठा खात्याला नक्कीच काही तरी काळेबरे आढळले असणार. त्यामुळे धान्य वितरणातील गैरप्रकाराला काहीही संबोधले तरी यातील ‘काळाबाजार’ बाजूला काढता येणार नाही. सर्वात निंदनीय म्हणजे केारोनाच्या काळात म्हणजेच २०१९-२० ते २०२०-२१ या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईची आकडेवारी पाहिली तर ताकाला जाऊन भांडे लपविता येणार नाही. म्हणूनच या प्रकरणाचे गांभिर्य अधिक आहे.
नाशिक जिल्ह्यातच काहीतरी विपरित घडले असे नाही. २०२० मध्ये म्हणजेच मागील वर्षी काेरोनातील मोफत धान्यात घोळ झाल्याची बाब राज्यात अनेक ठिकाणी उघडकीस आली होती. अलिबाग, अहमदनगर, सांगली, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांमधील रेशनच्या यंत्रणेला बट्टा लागून गेला आहे. काही प्रकरणांमध्ये तर गुन्हे शाखेने धाडी टाकून धान्य पकडले आहे. गव्हाचे पीठ बनविणाऱ्या कारखान्यांमध्ये रेशनचे गहू पोहोचविले जात असताना मुंबई पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये हे सारे प्रकार उघड झाले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन वर्षातील मोठी कामगिरी समोर आल्याने जनमाणसात चांगलाच संदेश गेला आहे. रेशनच्या यंत्रणेवर यामुळे वचक निर्माण होणार आहे. अपहार की गैरप्रकार, असे अर्थ काढण्यात कथ्याकूट केला गेला तर त्यातून आणखी वेगळाही अर्थ काढला जाऊ शकतो, हेही लक्षात घेतले पाहिजे.
तसेही अपहार किंवा गैरप्रकार यांची व्याख्या एकमेकांच्या जवळ जाणारीच आहे. हिरावून घेणे, दुसऱ्याच्या द्रव्याची अन्यायाने लूट करणे असा अर्थ मानला जातो. सरते शेवटी काय तर गोरगरिबांचे धान्य त्यांच्यापर्यंत पोहोचले नसेल किंवा त्याचा हिशेब लागला नसेल किंवा निर्धारित वेळेनंतरही दुकानांमधून धान्य वितरित झाले असेल तर काही तरी काळेबरे घडले असेल, असाच अर्थ सर्वसामान्य काढणार. त्यामुळे अपहार काय किंवा गैरप्रकार म्हटले तरी काय फरक पडतो?
- संदीप भालेराव, (जिल्हाधिकारी कार्यालयातून)