नाशिक : देवळाली कॅम्प येथील रहिवासी छाया आडके-खुटाळ नुकत्याच झालेल्या ‘मिसेस इंडिया क्वीन आॅफ सबस्टन्स’ स्पर्धेत ‘इंडियन फेस आॅफ द इअर’ची मानकरी ठरली आहे.१२ ते १४ एप्रिल दरम्यान ही स्पर्धा दिल्ली येथे पार पडली. निरनिराळ्या ग्रुमिंग सेशननंतर उत्कंठादर्शकतेने ही स्पर्धा पार पडली. त्यात मूळ नाशिकच्या कन्या व हल्ली इंदूर येथील रहिवासी छाया आडके-खुटाळ विजेती ठरली आहे. बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी, दिग्दर्शक समीर डिझायनर पूजा पेशावर यांच्या हस्ते तिच्या डोक्यावर मुकुट चढविण्यात आला. छाया यांचे शिक्षण सेंट फिलोमिना शाळेत झाले असून, एसव्हीकेटी महाविद्यालयात त्यांचे उच्चशिक्षण झाले आहे. त्यांनी सूक्ष्मजीवशास्त्र विषयात पदवी आणि औषधनिर्माणशास्त्र विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यांनी एअर होस्टेस म्हणूनही काम केले आहे. सध्या त्या इंदूर येथील शिशुकुंज इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आजपर्यंत ‘मिस नाशिक’, ‘मिस औरंगाबाद’, ‘मिस महाराष्ट्र’ आदी स्पर्धा जिंकल्या आहेत. या स्पर्धेत सिंगापूर, हॉँगकॉँग, जर्मनी, जपान, अमेरिका आदी विविध देशांतील ४४ स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. विविध फेऱ्यांमध्ये १५ स्पर्धकांची निवड करण्यात आली.मिसेस इंडियाची आजीवन प्रशिक्षक रमोन लाम्बा, वरुण कात्याला आणि शिवानी शर्मा यांनी ब्यूटी, कॅटवॉक, प्रेरणादायी आदि विविध सत्रांद्वारे स्पर्धकांची तयारी करून घेतली होती.
नाशिकची छाया ठरली ‘मिसेस इंडिया’ विजेती
By admin | Published: April 23, 2017 2:23 AM