इगतपुरी : मुंबईतील बोरीवली येथील हरवलेली १२ वर्षांची मुलगी इगतपुरी रेल्वे स्टेशनवर पोहोचली. त्यानंतर इगतपुरी रेल्वे पोलिसांनी या मुलीला ताब्यात घेत तिच्या पालकांच्या स्वाधीन केले. आपण चुकून इगतपुरी रेल्वे स्थानकात आल्याचे सदर मुलीने सांगितले.
इगतपुरी येथे कर्तव्यावर हजर असलेले पोलीस हवालदार साळेकर, गवारगुरु, पाटील यांना १२ वर्षांची एक मुलगी रेल्वे स्टेशन इगतपुरी येथे प्लॅटफॉर्म क्र. २ वर एकटी दिसून आली. त्यावरून तिला इथे येण्याचे कारण विचारले असता तिने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे तिला रेल्वे पोलीस ठाणे, इगतपुरी येथे नेण्यात आले. पोलीस ठाण्यात आणून तिची विचारणा केली असता तिने आपले नाव पोलिसांना सांगून ती मुंबईतील बोरीवली येथील रहिवासी असल्याची माहिती दिली. रेल्वेमधून चुकून इगतपुरी रेल्वे स्टेशन येथे आल्याचे तिने सांगितले. त्यानुसार स्टेशन ड्युटीवर हजर असलेले कर्मचारी यांनी कार्यतत्परता दाखवून तिला पोलीस ठाण्यात आणून ठाणे अंमलदार पोलीस हवालदार भालेराव यांनी तिच्या संरक्षणासाठी पोलिसाची नेमणूक केली. रेल्वे पोलीस ठाणे बोरीवली येथील महिला पोलीस कॉन्स्टेबल सुषमा जाधव यांनी मुलीचे वडील यांच्याकडे तिला स्वाधीन केले.
इगतपुरी रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेने मुलीला पालकांच्या ताब्यात दिल्याने पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक काजवे, प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक एस. बी. भाईक, पोलीस उपनिरीक्षक मुरारी गायकवाड यांनी पोलीस हवालदार साळेकर, गवारगुरु, भालेराव, पोलिस कॉन्स्टेबल पाटील, मपोकॉ मारबदे, पोलीस कॉन्स्टेबल निचत यांचे कौतुक केले.