नाशिक : शहरातून अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली असून, शुक्रवारी (दि़५) तीन मुले व एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे़ नाशिकरोड, इंदिरानगर व पंचवटी परिसरात या घटना घडल्या असून, या प्रकरणी पोलीस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़
नाशिकरोडच्या पंचक परिसरातील विद्यालयात शिक्षण घेत असलेले सोळा वर्षीय दोन मित्र बेपत्ता झाले आहेत़ आडगाव व गंगापूर कॅनॉल परिसरातील ही मुले असून, गुरुवारी (दि. ४) दुपारी १२ ते ४ या कालावधीत शाळेत असताना या दोघांनी ‘आई आजारी आहे’, असे सांगून शाळेतून निघून गेले; मात्र घरी परतले नाही़ या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचवटी परिसरातील दत्तनगरमधील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगा शुक्रवारी (दि़५) सकाळी सात वाजता ‘मी शाळेत चाललो आहे’, असे सांगून घरातून गेला, मात्र घरी परतला नाही. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेऊनही तो न सापडल्याने अखेर पंचवटी पोलीस ठाणे गाठून अपहरणाची फिर्याद दिली.
इंदिरानगर परिसरातील चेतनानगरच्या लालबाग चौकातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे़ गुरुवारी (दि़४) सायंकाळी बेपत्ता झालेल्या या मुलीचा सर्वत्र शोध घेऊनही ती न सापडल्याने कुटुंबीयांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अपहरणाची फिर्यादी दिली आहे़