चांदवड : तालुक्यातील नागरिकांनी रेशनकार्ड संदर्भात कागदपत्रांची पूर्तता केली असतानाही तहसीलदार कार्यालयामार्फत कागदपत्रांची अपूर्तता असल्याबाबत नागरिकांना नोटिसा पाठविण्यात येत आहेत. मात्र प्रत्यक्षात रेशनकार्डसाठीच्या कागदपत्रांची पूर्तता करूनही सुमारे एक महिना होऊनही रेशनकार्ड मिळत नसल्याने याबाबत अधिक चौकशी करता रेशनकार्डची प्रकरणे गहाळ झाल्याचे अनेक नागरिकांच्या लक्षात आले आहे. त्यांना सेतू विभागाने विशिष्ट तारखेला येऊन कार्ड घेऊन जावे अशी पावती दिलेली असतांना कागदपत्रे गहाळ झाल्याचे निदर्शनास आल्याने सदर प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश खैरनार यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे. चांदवड येथील भारत सुरेश पंडित यांनी रेशनकार्ड प्रकरणासाठी संपूर्ण कागदपत्रे जमा केली असता त्याबाबत सेतू विभागाने जमा पावती दिलेली आहे. तहसीलदार कार्यालयाकडून कागदपत्रांची अपूर्तता असल्याबाबत भारत पंडित यांना नोटीस पाठविण्यात आली. सरदर प्रकरणाची कोणत्या कागदपत्रांची अपूर्तता असल्याबाबत पुरवठा अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी प्रकरण सापडत नाही. सदर प्रकरणाची जमा पावती असतांनही प्रकरण गहाळ झाल्याची उडवाउडवीची उत्तरे जबाबदार अधिकाऱ्यांकडून नागरीकांना दिली जातात. अशा प्रकारे चांदवड तालुक्यातील असंख्य नागरिकांना वेठीस धरून रेशनकार्ड देण्यास टाळाटाळ केली जात आहे. तरी याप्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा गणेश खैरनार यांनी दिला आहे. ( वार्ताहर)
रेशनकार्डची अनेक प्रकरणे गहाळ
By admin | Published: January 14, 2016 10:12 PM