पिंपळगाव बसवंत : एकीकडे अमानवी कृत्यांची मालिका सुरू असताना सामाजिक बांधिलकी जपत माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या घटनाही पहावयास मिळत आहे. अशा सुखदायी घटनेचे पिंपळगावकर साक्षीदार ठरले आहेत. पंधरा दिवसांपासून बेपत्ता गतिमंद नातवास सामाजिक कार्यकर्त्यांनी सुखरूप घरी सोडताच त्याच्या आजोबांना गहिवरून आले.रविवारी रात्रीच्या सुमारास येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांना दुर्गेश सोनवणे (१२) गतिमंद मुलगा दिसून आला. त्याला ऐकता व बोलता येत नसल्याने काय करावे, हे समजेना अखेर त्यांनी दुर्गेशला पिंपळगाव पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी विचारपूस केली. पण त्यांना काही समजेना. नंतर त्यांनी पाटी-पेन्सिल देत त्यावर लिहिण्यास सांगितले. दुर्गेशने काही क्रमांक व गावांची नावे लिहिली. त्या क्रमांकावर संर्पक साधला असता तो चाळीसगाव येथील एका मूकबधिर शाळेत लागला. त्यावेळी दुर्गेश या शाळेत वास्तव्यास असल्याचे समजले. तेथून दुर्गेशच्या अजोबांचा भ्रमणध्वनीही मिळाला. त्याचे आजोबा चंद्रकांत सोनवणे यांच्याशी संपर्क साधला. ते नाशिक येथील कुंभारवाडा परिसरात वास्तव्यास असल्याचे समजले. केशव बनकर व पोलीस कर्मचारी दुर्गेश बैरागी दुर्गेशला घेऊन आजोबाच्या घरी पोहोचले. बेपत्ता झालेला नातूला पाहताच आजोबांना आनंदाश्रु अनावर झाले.
बेपत्ता गतिमंद मुलगा सुखरूप घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 10:52 PM