लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : बालकांचे मृत्यू व आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी त्याचबरोबर गरोदर मातांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी सोमवार (दि.६)पासून येणाऱ्या सात दिवसांत ‘मिशन इंद्रधनुष्य’ लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला असून, त्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण ११८० बालकांना व २११ गरोदर मातांना या लसीकरणाचा लाभ होणार आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार बालकांना १०० टक्केलसीकरणाने संरक्षित करण्यासाठी विशेष मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. पुढील २ महिने फेब्रुवारी, मार्चमध्ये दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी सुरू करून सुटीचे दिवस वगळता एकूण सात दिवस ही विशेष लसीकरण मोहीम प्रत्येक महिन्यात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये घटसर्प, गोवर, धनुर्वात यांचा मागील दोन वर्षांत उद्रेक झालेला भाग, तसेच नियमित लसीकरणाचे काम कमी असणारे भाग, छोटासा भेट न दिलेला भाग, पल्सपोलिओ जोखीमग्रस्त भाग, वीटभट्टी कामगार, ऊसतोड कामगार, अतिदुर्गम भाग, डोंगराळ भाग, सलग तीन सत्रं लसीकरण रद्द झालेली गावे किंवा विभाग आरोग्यसेविका पद रिक्त असलेली उपकेंद्राची गावे तसेच शहरी भागातील झोपडपट्टी स्थलांतरित वस्त्यांमध्ये ‘मिशन इंद्रधनुष्य’ मोहिमेचे लक्ष केंद्रित केले जात आहे. या मोहिमेसाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, या अंतर्गत येणा-या गावांमध्ये आशा कार्यकर्तीमार्फत घरोघरी जाऊन कुटुंबाचे सर्वेक्षण करून वंचित लाभार्थी माता व बालकांची यादी तयार करण्यात आली आहे, या कार्यक्रमाची जनजागृती करण्यासाठी सर्व शाळांमध्ये रॅली, ग्रामसभा, गट सभांमधून माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. प्रकाश नंदापूरकर, परिवहन विभागाचे नितीन मैंद, शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर यांनी केले आहे.