बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळी १० वाजता मध्यवर्ती बसस्थानक चौकात भारतीय कम्युनिष्ठ पक्षाच्या वतीने फेरी काढून व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर शिवाजीरोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे सर्व भाजपेतर पक्षांच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत केंद्र सरकारचा निषेध नोंदवित आवाहन फेरी काढली. शालिमार चौकात फेरी येताच पोलिसांनी त्यांना एकत्र जमण्यास व आवाहन फेरी काढण्यास मज्जाव केल्याने कार्यकर्ते व पोलिसांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर पोलिसांनी परवानगी दिल्यावर दोन गटांत कार्यकर्ते विभागले गेले. शिवाजीरोड, मेनरोड, रविवार कारंजा, अशोकस्तंभ, महात्मा गांधीरोडमार्गे व्यापारी, व्यावसायिकांना बंदचे आवाहन करण्यात येऊन पत्रकांचे वाटप करण्यात आले. तत्पूर्वी सकाळी या मार्गावर काही दुकाने नेहमीप्रमाणे उघडली होती, मात्र आवाहनानंतर व्यापाऱ्यांनी दुकानांचे शटर डाउन केले. या फेरीचा समारोप मध्यवर्ती बसस्थानकासमोरील छत्रपती शिवाजी पुतळा येथे समारोप करण्यात आला. या फेरीत डॉ. डी. एल. कराड, शरद आहेर, रवींद्र पगार, शोभा बच्छाव, राजू देसले, तानाजी जायभावे, अण्णासाहेब कटारे, महादेव खुडे, अरुण काळे, करण गायकर, शब्बीर शेख, अजमल खान आदी सहभागी झाले होते.
चौकट==
मंगळवारमुळे सराफ बाजार बंद
‘भारत बंद’मध्ये सहभागी होण्यासाठी सर्व व्यवसाय व व्यापाऱ्यांना आवाहन करण्यात आले असले तरी, मंगळवारी सराफ बाजार बंदच राहत असल्याने शहरातील सर्व सराफ दुकाने बंदच होती, तर खासगी कॉर्पोरेट कंपन्या, बँका, पतसंस्थांचे व्यवहार पूर्ववत सुरू होते.