‘सद्य:स्थिती’त आमदार हिरामण खोसकर काँग्रेसमध्येच; १५ फेब्रुवारीला भूमिका स्पष्ट करणार
By धनंजय वाखारे | Published: February 12, 2024 06:38 PM2024-02-12T18:38:22+5:302024-02-12T18:40:41+5:30
काँग्रेसचे ११ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली.
नाशिक: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार अशोक चव्हाण यांनी सोमवारी (दि. १२) पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यासमवेत पक्षत्याग करणाऱ्यांमध्ये इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांच्या देखील नावाची चर्चा सुरू झाली. परंतु खोसकर हे केनियात अभ्यास दौऱ्यावर असून, त्यांच्या पक्षांतराबाबत सद्य:स्थितीत काहीही तथ्य नसल्याचे सांगतानाच येत्या १५ फेब्रुवारीला मायदेशी परतल्यानंतर खोसकर आपली भूमिका स्पष्ट करतील, असा खुलासा एका पत्रकान्वये खोसकर यांच्या संपर्क कार्यालयातून करण्यात आला आहे.
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्यासमवेत काँग्रेसचे ११ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यात नाशिक जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव आमदार हिरामण खोसकर यांचेही नाव पुढे आले. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणातही खळबळ उडाली. याबाबत हिरामण खोसकर यांचे सुपुत्र वामन खोसकर यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता त्यांनी या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे सांगत आमदार खोसकर हे परदेशातून परतल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करतील, असे सांगितले. त्यापाठोपाठ लगेचच खोसकर यांच्या संपर्क कार्यालयामार्फत खुलासावजा पत्र जारी करण्यात आले. या पत्रात म्हटले आहे, आमदार खोसकर हे ५ फेब्रुवारीपासून राज्य शासनाच्यावतीने होत असलेल्या अभ्यास दौऱ्यासाठी केनिया देशात गेले आहे. त्यांच्या पक्षांतराबाबतची चर्चा होत आहे; परंतु सद्य:स्थितीत तसे काहीही नाही. खोसकर हे १५ फेब्रुवारीला अभ्यास दौरा पूर्ण करून मायदेशी परतणार आहेत. त्यानंतर ते स्पष्ट भूमिका घेतील.