नाशिक: कोरेानाच्या पार्श्वभूमीवर आमदारांना देण्यात येणाऱ्या एक कोटीच्या निधीत ५० लाखांची वाढ यापूर्वीच करण्यात आलेली आहे. कोरेानाशी लढताना अनेक साधनसामग्रीची आवश्यकता असून निधी दोन कोटी करण्याबाबत आमदारांकडून सातत्याने मागणी होत असल्याने सरकार त्याबाबत सकारात्मक विचार करत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोरोनावर मात करण्यासाठी निधी खर्चाबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले.
नाशिक जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती तसेच खरीप हंगामाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी घेतला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील कोरोनाचे संकट अजूनही कमी झालेले नसून कोरोनाशी लढण्यासाठी लागणारी साधनसामग्री उभी करण्याचा राज्य शाससनाने प्रयत्न केला आहे. जिल्ह्याच्या नियोजन आराखड्यातून ३० टक्के निधी कोराेनावर खर्च करण्याला परवानगी देण्यात आलेली आहे. पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यासही मान्यता देण्यात आली असून काही कामे सीएसआर फंडातून करण्यासाठीही सांगण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले. कोरेानावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील ऑक्सिजनची गरज जिल्ह्यातच भागविली जाईल त्यादिशेने नियोजन करावे, अशी चर्चा करण्यात आलेली आहे. महागडे इंजेक्शन राज्य शासनाकडून पुरविण्याबाबतचा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर भर देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र हे लसीकरणात प्रथम क्रमांकावर असल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले.
----इन्फो--
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सीबीआय चौकशीची मागणी केल्याबाबत अजित पवार यांना विचारले असता चंद्रकांत पाटील वैफल्यग्रस्त झाले असल्याची टीका त्यांनी केली. आपल्यावर आरोप करणारा जेल मध्ये असून त्याच्या आरोपांवर विश्वास ठेवणार का? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला. चंद्रकांत पाटील मंत्री असतांना कोल्हापूरच्या शिवसेना आमदाराने पाटील यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते तेव्हा लोकप्रतिनिधींचे ऐकले नाही आणि आता एका आरोपांच्या तक्रारींमुळे सीबीआय चौकशीची मागणी करणारेच वैफल्यग्रस्त झाल्याचे पवार म्हणाले. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर हल्ला करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, असे सांगताना कायदा कुणीही हातात घेऊ नये, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादीवर गरळ ओकणाऱ्या पडळकरांना बारामतीकरांनी चांगलेच ओळखले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
पदोन्नती आरक्षणाबाबत विरोधकांकडून गैरसमज
ओबीसींच्या आरक्षणाबाबतचा निर्णय उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असतानाही विरोधकांकडून राज्य शासनाबाबत गैरसमज पसरविले जात असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. फुले, शाहू, आंबेडकर विचारसरणीचा पुरस्कार करणारा आपला पक्ष असून, विरोधकांकडून या विषयावर राजकारण केले जात असल्याचेही पवार म्हणाले. राज्य सरकार मागासवर्गीयांच्या पदोन्नती आरक्षणाला विरोध करीत असल्याचा विरोधकांचा आरोप चुकीचा असल्याचे पवार म्हणाले. हे प्रकरण २००४ पासून असून, मध्यंतरीच्या काळात तीन सरकारे आली. त्यांनीही याबाबत निर्णय का घेतला नाही, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. न्यायालयीन बाब असल्याने निर्णय घेता येत नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
--इन्फो--
मुख्यमंत्री व्हावे असे नाही वाटत
राज्यात सातत्याने घडणाऱ्या राजकीय घडामोडींमुळे आपणाला मुख्यमंत्री म्हणून बढती मिळावी असे वाटत नाही का? असा प्रश्न विचारला पवार यांनी अजिबात वाटत नाही असे उत्तर दिले. एकच कुणीतरी मुख्यमंत्री होतो असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच पाच वर्षे मुख्यमंत्री राहतील, असेही ते म्हणाले.