लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांना देण्यात येणाऱ्या एक कोटीच्या निधीत ५० लाखांची वाढ यापूर्वीच करण्यात आलेली आहे. कोरोनाशी लढताना अनेक साधनसामग्रींची आवश्यकता असून निधी दोन कोटी करण्याबाबत आमदारांकडून सातत्याने मागणी होत असल्याने सरकार त्याबाबत सकारात्मक विचार करत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोरोनावर मात करण्यासाठी निधी खर्चाबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असल्याचेही पवार यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती तसेच खरीप हंगामाचा आढावा त्यांनी गुरुवारी घेतला. पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यासही मान्यता देण्यात आली असून, काही कामे सीएसआर फंडातून करण्यासाठीही सांगण्यात आले आहे. महागडे इंजेक्शन राज्य शासनाकडून पुरविण्याबाबतचा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे, असेही ते म्हणाले.