शहापूर/कसारा : नाशिक येथील भाजपाच्या आमदार सीमा हिरे यांच्या मोटारीला कसाºयाजवळ दुस-या मोटारीने धडक दिली. यावेळी झालेल्या बाचाबाचीत हिरे यांच्या अंगरक्षकाने काही तरुणांना मारहाण केल्यानंतर ग्रामस्थ धावून आल्याने काही काळ वातावरण तंग झाले होते. प्रकरण पोलीस ठाण्यात गेल्यावर तेथे परस्परांची माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला. आमदार हिरे या शुक्रवारी सकाळी नाशिकहून मुंबईकडे निघाल्या होत्या.
कसा-याजवळ एका मोटारीने धडक दिल्यामुळे हिरे यांची मोटार बाजूला फेकली गेली. त्यांच्या सोबत त्यांची मुलगी आणि त्यांचा अंगरक्षक ओव्हळ होता. अपघातानंतर धडक दिलेल्या मोटारीचा चालक व त्यातील चार तरुण पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना हिरे यांचा मोटार चालक तसेच अंगरक्षकाने पाठलाग करु न त्यांना पकडले. त्यावेळी बाचाबाची व हाणामारी झाली. ग्रामस्थ जमल्यानंतर प्रकरण कसारा पोलीस ठाण्यात गेले. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी कारवाईची मागणी केली. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दोघांची समजूत घातली. त्यानंतर एकमेकांची माफी मागून प्रकरण मिटवण्यात आले.नाशिकहून मुंबईला जात असताना शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास पाठीमागून आलेल्या एका मोटारीने आमच्या गाडीला धडक दिली आणि नंतर ते पळून गेले. त्यामुळे आम्ही त्या गाडीचा पाठलाग करून त्यांना अडवले. अपघात करून पळून जाणे हे चुकीचे असल्याने त्यांना विचारणा करण्यासाठी अडवले तेव्हा त्या मोटारीतील दहा ते बारा स्थानिक युवकांनी थेट क्रिकेटची बॅट वैगरे साहित्य घेऊन मारण्यासाठी धावले. त्यामुळे त्यांच्याशी बॉडीगार्डची झटापट झाली. हे युवक स्थानिक असल्याने त्यांनी ग्रामस्थांना बोलविल्यानंतर वाद पोलीस ठाण्यात गेला.
तेथे त्या युवकांनी माफी मागितली. त्यांच्या भवितव्याचा विचार करून आम्हीही पोलिसांत तक्रार केली नाही. गाडीत माझी मुलगी, बॉडीगार्ड आणि चालक तसेच मी असे चौघेच होतो. गाडीला अत्यंत जोराची धडक बसल्याने आमची मानसिकता ठीक नसताना संबंधित युवकांनी हल्ला केला. अशास्थितीत बॉडीगॉर्ड किंवा मी रिव्हॉल्वर दाखवून धमकविल्याचे चुकीचे वृत्त काही माध्यमांनी दाखविले. असा कोणताही प्रकार घडला नव्हता. -सीमा हिरे, आमदार