धनंजय रासकर
नाशिक : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुक्रवारी(दि.१४) होणाऱ्या आभार दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. ११) सकाळी शासकीय विश्रामगृहात शिंदेसेनेची नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत शिंदेसेनेतील नेत्यांची गटबाजी दिसल्याचे पहायला मिळाले. ऐन उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या आधीच पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याने सुहास कांदे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यावर चांगलेच संतापलेले पहायला मिळाले.
गटबाजी करणाऱ्या शिंदेसेनेच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी फैलावर धरत चांगलाच दम दिला. सोबतच, आपापसातील गटतटच बाजूला ठेवत जास्तीत जास्त शिवसैनिकांना आभार मेळाव्याला घेऊन येण्याच्या सूचनाही दिल्या. गेल्या काही दिवसांपासून शिंदेसेनेेत अंतर्गत गटबाजी असल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच नाशिकमध्ये शुक्रवारी (दि.१४) एकनाथ शिंदे यांची आभार सभा होणार आहे. सभेची नियोजन बैठक शिवसेनेचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांची नियोजन सभा शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार होती. मात्र दादा भुसेंना शिक्षण विभागाच्या ऐनवेळच्या बैठकीमुळे नियोजन बैठकीला येण्सास उशीर झाला. त्यापूर्वीच सुहास कांदे यांनी नियोजन बैठक सुरु केली होती. यावेळी उपस्थित काहींनी गटबाजीच मुद्दा मांडताच सुहास कांदे संतापले होते.