नाशिक (सुयोग जोशी) : दिवाळीला फक्त एक महिना उरला असताना आता सगळीकडे फराळ तयार करण्याची लगबग सुरू आहे. मात्र, ऐन सणासुदीच्या काळात नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांत भेसळयुक्त तेल, तसेच तळल्या जाणाऱ्या तेलाचा सातत्याने होणारा वापर, याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नाशिक विभागात केवळ तीनच टीपीसी यंत्र कशी, ती कधी वाढविणार, असा प्रश्न आमदारसत्यजित तांबे यांनी उपस्थित केला आहे.
नाशिक ‘लोकमत’मध्ये दि. ७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘वारंवार तळले जाणारे खाद्यतेल ओळखणार तरी कसे’ या बातमीची गंभीर दखल तांबे यांनी घेतली आहे. त्या बातमीचा आधार देत तांबे यांनी अन्न व औषध प्रशासनाला योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली आहे. वारंवार तळले जाणाऱ्या तेलातील भेसळ ओळखण्यासाठी टीपीसी नावाचं यंत्र वापरलं जातं. पाच जिल्ह्यांमध्ये मिळून अशी फक्त तीनच यंत्रे आहेत. या परिस्थितीकडेही तांबे यांनी लक्ष वेधलं आहे.
सणासुदीचा काळ आला की, दूध, मावा यांच्यासोबतच तेलात भेसळ होण्याचे प्रमाण वाढते. तेलातील भेसळीचं प्रमाण तपासण्यासाठी टोटल पोलर काऊंट म्हणजे टीपीसी नावाचं यंत्र वापरलं जातं. मात्र, अन्न व औषध प्रशासनाच्या नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये मिळून फक्त तीनच यंत्रे उपलब्ध आहेत. त्यामुळे तेलातील भेसळ ओळखणार कशी, असा सवाल तांबे यांनी उपस्थित केला.
धडक मोहीम राबविण्याची गरज
भेसळयुक्त तेलात तयार झालेल्या खाद्यपदार्थांमुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी संभवतात. यात घसा खवखवण्यापासून थायरॉइड, सर्दी-खोकला आणि कोलेस्ट्रॉल वाढून हृदयरोगाच्या समस्या अशा अनेक तक्रारींचा समावेश आहे. याला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने खास दिवाळी आधी धडक मोहिमा राबवण्याची गरज तांबे यांनी बोलून दाखवली. तसंच प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन यंत्रे तरी उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणीही तांबे यांनी केली आहे.अधिकारीच करतात लिपिकाची कामं
अन्न व औषध प्रशासनाच्या नाशिक विभागात एकूण १९ पदं मंजूर आहेत. मात्र, सध्या फक्त सहा अधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरचा ताण वाढला आहे. कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने लिपिकांची कामंही अधिकाऱ्यांना करावी लागत आहेत. त्याशिवाय संपूर्ण नाशिक विभागात मिळून फक्त एक वाहन उपलब्ध असल्याने अधिकारी वर्गाचीही अडचण होत असल्याचं समोर येत आहे. कर्मचाऱ्यांची संख्याही वाढविण्याची गरज असल्याचे तांबे यांनी सांगितले.